Pune | पुण्यात २ दिवसांत १५ गुन्ह्यांची नोंद; चोरी, लुटमारीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:32 AM2023-01-06T08:32:28+5:302023-01-06T08:35:02+5:30
अवघ्या दोन दिवसांत १५ गुन्ह्यांची नोंद ...
पुणे : शहरात चोरी, लुटमारीच्या घटना सुरूच असून, नववर्षात सामान्यांसह प्रवाशांच्या खिशांवर डल्ला मारण्याचे आणि महिलांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अवघ्या दोन दिवसांत १५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
या घडल्या घटना
• मंगळवार पेठेत राहणाऱ्या एका महिलेची तीन लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. फियार्दी महिला पेरणे फाटा येथे पीएमपी बसमध्ये घडली. चढत असताना ही घटना घडली. याच ठिकाणी अमोल अल्हाट या तरुणाची दीड लाखाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. तसेच अजय डंबाळे या तरुणाची सुमारे दोन लाखांची सोनसाखळीदेखील याच ठिकाणी पीएमपीमध्ये चढताना लंपास करण्यात आली.
• मगरपट्टा येथे सराफा दुकानातून ऐंशी हजारांची सोनसाखळी चोरीला गेली. मेघश्याम धनावडे यांनी फिर्याद दिली आहे.
• दुचाकीस्वार चोरट्यांनी शाहू उद्यान परिसरातून रास्ता पेठेतील महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले, तर सिंहगड रस्त्यावर एका महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली.
• सिंहगड रस्त्यावरील बसथांब्यावर थांबल्या असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
• ज्येष्ठ नागरिकाची ४८ हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरट्यांनी हिसकावली. याबाबत चंद्रपूर येथील ७५ वर्षांच्या नागरिकाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी येरवडा येथून आळंदी ते स्वारगेट या बसमधून प्रवास करीत होते. बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या एका महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावले, शेवाळवाडी येथील बसथांब्यावर ही घटना घडली.
• बंडगार्डन येथील बँकेतून काढलेली पेन्शनची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. वाकडेवाडी परिसरात शंकर नवनाथ हनुवते (वय ३१, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. नागरिकावर वार करून सुमारे पंधरा हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत अमर तांबोळी (वय ४१, रा. गोपाळ पट्टी, मांजरी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. दोन मोबाइल आणि रोख रक्कम असा १४ हजार ६५० रुपयांचा ऐवज लांबविला.
• पॅन्टच्या खिशात ठेवलेली पन्नास हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी धायरी येथील सयाजी यादव (वय ५५) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.