साखर निर्यातीच्या बहाण्याने दीड कोटींचा गंडा; कोथरुडमधील ६३ वर्षाच्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: May 31, 2023 04:22 PM2023-05-31T16:22:37+5:302023-05-31T16:22:51+5:30
साखर खरेदी करुन निर्यातीसाठी देण्याचा बहाणा करुन १० टक्के अॅडव्हान्स घेऊन साखर निर्यात न करता अँडव्हान्स व कंटेनर बुंकीगचे दीड कोटी रुपयांना गंडा
पुणे : साखर खरेदी करुन निर्यातीसाठी देण्याचा बहाणा करुन १० टक्के अॅडव्हान्स घेऊन साखर निर्यात न करता अँडव्हान्स व कंटेनर बुंकीगचे दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत हसन अली पुराहित (वय ६२, रा. अंधेरी, मुंबई) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. उमेश कृष्ण जोशी (वय ६३, रा. रामकांता अपार्टमेंट, डहाणुकर कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १४ मार्च २०२१ पासून आतापर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. उमेश जोशी याची ओरा एंटरप्रायजेस ही कंपनी सदाशिव पेठेत आहे. फिर्यादी यांना दुबईला ५१८४ टन साखर निर्यात करायची ऑर्डर मिळाली होती. मुंबईतील दिवेश जोशी यांनी पुण्यातील उमेश जोशी तुमची मागणी पूर्ण करतील, असे सांगितले. त्यांच्यात व्यवहार ठरला. त्यासाठी जोशी याने त्यांना १० टक्के अॅडव्हान्स मागितले. त्यानुसार फिर्यादी यांनी १ लाख ८६ हजार ६२४ डॉलर (१ कोटी ३८ लाख ८४ हजार ८२६ रुपये) त्यांना ऑनलाईन जमा केले. आरोपीने साखर निर्यात करतो, असे सांगून वेळेवर साखर पुरविली नाही. निर्यातीसाठी त्यांनी कंटनेर बुक केले होते. तसेच साखरेच्या वाहतूकीसाठी ट्रान्सपोर्ट कंपनीला पैसे दिले होते. साखर न पुरविल्याने त्यांना या ऑर्डर रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला. साखर निर्यात न करता फिर्यादीने दिलेले अॅडव्हान्स रक्कम व कंटेनर बुंकिग असे एकूण १ कोटी ५७ लाख ३० हजार २३० रुपयांची फिर्यादीची फसवणूक केली. तसेच महेश पगडे यांना १० कोटींचे कर्ज देतो, असे सांगून त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी तपास करीत आहेत.