जिल्हा, राज्याबाहेर फिरून आल्यास १५ दिवस क्वारंटाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:49+5:302021-06-20T04:08:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागासह राज्यातील इतर काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागासह राज्यातील इतर काही जिल्ह्यांत अद्यापही गंभीर परिस्थिती कायम आहे. परंतु पर्यटनाच्या नावाखाली बाहेर फिरायला जाणाऱ्या पुणेकरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर शहराची रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू शकते. यामुळेच जिल्हा, राज्याबाहेर फिरून आलेल्या पुणेकरांना आम्हाला नाइलाजास्तव १५ दिवस क्वारंटाइन करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.
जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पवार यांनी सांगितले की, शहर आणि जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. परंतु निर्बंध शिथिल केल्याने नागरिकांकडून सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी केली जात आहे. निर्बंध शिथिल केले ते नागरिकांच्या सोयीसाठीच; पण याचा गैरफायदा घेणे चुकीचे आहे. अमेरिका, युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिकेत एवढी काळजी घेऊन व मोठ्या प्रमाणात लसीकरण करूनदेखील कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यामुळेच आपण कोरोनाचे निर्बंध व नियमावलीची कडक अंमलबजावणी केलीच पाहिजे. सर्वांनीच कोरोना गांभीर्याने घेतला पाहिजे, अन्यथा वाईट परिस्थिती निर्माण होईल, असा इशारादेखील पवार यांनी दिला.
-------
शनिवार-रविवाराचा वीकेंड लाॅकडाऊन कायम
पुणे शहरात निर्बंध शिथिल केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात किल्ले सिंहगड, लोणावळा येथे पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली. कोरोना महामारीचे संकट गंभीर असताना जिल्ह्यासाठी अशी गर्दी होणे फारच चुकीचे आहे. यामुळेच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी वीकेंड लाॅकडाऊनचा निर्माण कायम राहणार असून, वीकेंडला पर्यटनावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.
--------
वीकेंडशिवाय इतर दिवशी पर्यटनास परवानगी
यंदाचा माॅन्सून हंगाम सुरू झाला असून, कोरोना संकटामुळे गेले १३-१४ महिने घरात बसलेल्या नागरिकांना पावसाळी पर्यटनाचे वेध लागू लागले आहेत. परंतु वीकेंडला सिंहगड, लोणावळासह जिल्ह्यातील इतर गडकिल्ल्यांवर होणारी गर्दी तिसऱ्या लाटेसाठी निमंत्रक ठरू शकते. यामुळेच यापुढेदेखील अपेक्षित प्रमाणात रुग्णसंख्या कमी होत नाही, तोपर्यंत वीकेंड लाॅकडाऊन सुरूच राहणार असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत.