खडकवासला जवळील पारगेवाडीत १५ फुटांचा अजगर; सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 10:54 AM2023-08-11T10:54:28+5:302023-08-11T10:55:33+5:30
पारगेवाडी येथे रानात गुरे चरत असताना एका शेळीचा फडशा अजगराने फाडला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले
शिवणे : खडकवासला जवळच असलेल्या आगळंबे गावातील पारगेवाडी येथे गुरुवारी सकाळी एक महाकाय अजगर आढळून आला. पारगेवाडी येथे रानात गुरे चरत असताना एका शेळीचा फडशा अजगराने फाडला असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. काही सर्पमित्रांच्या मदतीने अजगराला पकडून जंगलात अधिवास क्षेत्रात सोडण्यात आले. सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असल्याने समस्त ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
गुरुवारी सकाळी महाकाय अजगराने एका शेळीचा फडशा पाडल्याची माहिती पारगेवाडीचे माजी उपसरपंच गणेश पारगे यांनी सर्पमित्रांना दिली. कोंढवे धावडे येथील सर्पमित्र रमेश राठोड यांच्या सह रोहन गायकवाड, मंगेश धावडे, अक्षय धोंडगे, नवनाथ ढवळे, रुतुराज काळे, गणेश पारगे यांनी मोठ्या साहसाने मृत शेळीला अजगराच्या विळख्यातून बाहेर काढले. अजगराची उंची १५ फुटापेक्षा जास्त होती तर वजन देखील १०० किलो पेक्षा जास्त असल्याची माहिती यावेळी सर्पमित्रांनी दिली. अशा प्रकारच्या महाकाय अजगराच्या प्रजाती साधारणपणे दक्षिण आफ्रिकेतील जंगलात आढळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्पमित्रांच्या प्रसंगसावधानातूने होणारा मोठा अनर्थ टळला असल्यामुळे खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर व कोंढवे धावडे गावचे उपसरपंच निखिल धावडे यांनी सर्पमित्र युवकांचे कौतुक केले.