मिनी बस उलटल्याने १५ भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:48 AM2017-08-13T03:48:31+5:302017-08-13T03:48:31+5:30
अष्टविनायकच्या दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावर बस उलटल्याने झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नसली
लोणी काळभोर : अष्टविनायकच्या दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावर बस उलटल्याने झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी पिंपरी-चिंचवड परिसरातील १५ नागरिक जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी संदेश धोंडिराम पुजारी (वय ३६, रा. बोरा पार्क, पिंपळे सौदागर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात थेऊर फाटा ते थेऊर गाव यादरम्यानच्या रस्त्यावर, गाढवेवस्तीनजीक झाला. संदेश पुजारी पत्नी, दोन मुले व शेजारील पाच कुटुंबे आपल्या मुलांसह मिनी बस (एमएच १४ सीडब्ल्यू ०१५०) अष्टविनायक यात्रेसाठी निघाले होते. बसमध्ये लहान मुलांसह एकूण वीस जण होते. त्यापैकी पंधरा जण जखमी झाले आहेत.
या अपघातात बहुतेक जखमींना हात-पाय, खांदा, डोके या ठिकाणी मार लागला आहे. किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. उर्वरित जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवालदार बाळासाहेब गव्हाणे अधिक तपास करीत आहेत.
मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन हे सर्व जण थेऊरकडे निघाले होते. त्यांची मिनी बस थेऊर फाट्यावरून थेऊर गावाकडे निघाली होती. सकाळी साडेदहा वाजता बस गाढवेवस्तीजवळच्या वळणावर चालक बालाजी पांडुरंग मुंढे (रा. काळेवाडी, पिंपरी) याचा बसवरील ताबा सुटल्याने बस डाव्या बाजूला उलटली. त्या वेळी गाडीचे तोंड विरुद्ध दिशेला झाले. बसमधील बहुतेक सर्वांना मार लागला. तेथे जमलेल्या नागरिकांनी व हवालदार बाळासाहेब गव्हाणे, लोकेश राऊत या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.