चांडोली ग्रामपंचायतीत १५ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:47+5:302021-06-16T04:14:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर : चांडोली (ता. खेड) ग्रामपंचायतीमध्ये सुमारे १५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्याबाबतीत दप्तर तपासणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : चांडोली (ता. खेड) ग्रामपंचायतीमध्ये सुमारे १५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्याबाबतीत दप्तर तपासणी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी केली आहे. गटविकास अधिकारी जोशी यांनी दप्तर तपासणी ताब्यात घेतले आहे. राजगुरुनगर शहरालगत मोठी ग्रामपंचायत असलेल्या चांडोलीतील या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
चांडोली येथील ग्रामपंचायत निवडणूक चार महिन्यांपूर्वी झाली. नवीन सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांच्या अगोदर असलेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यावर कोरोनामुळे निवडणूक लांबली होती. या कालावधीत प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक कामकाज पाहत होते. त्यांनी व व्यवस्थापक यांनी मिळून कर्मचाऱ्यांच्या नावे पगाराव्यतिरिक्त काही रक्कम खात्यावर जमा केली. तसेच सुमारे २३ लाख रुपये घरपट्टी वसूल केली. मात्र, ग्रामपंचायत खात्यात कमी रक्कम भरणा केल्याचे निदर्शनास आले. तीस ते चाळीस नवीन मिळकती नोंद करण्यात आल्या. मात्र, त्यासाठी असलेल्या लोकवर्गणीची रक्कम खात्यात जमा केली नाही. याबाबत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गेली चार महिने वारंवार विचारणा केली. मात्र, समाधानकारक खुलासा न करता ग्रामसेवक व कर्मचारी यांनी उलट उत्तरे दिली. अखेर सर्वांनी मिळून पोलिसांत तक्रार दिली आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशी करण्याचे पत्र देण्यात आले. याबाबत गटविकास आधिकारी यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. अहवालानंतर योग्य कारवाई होणार आहे. सरपंच सुनीता सावंत, उपसरपंच दत्तू वाघमारे, सदस्य सचिन वाघमारे, सतीश सावंत, रूपेश ताये यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार केली आहे. या गैरव्यवहारबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.