पुणे मेट्राेच्या माहिती काेचला पावणे दाेन लाख नागरिकांनी दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 07:20 PM2019-11-19T19:20:31+5:302019-11-19T19:22:14+5:30
महा मेट्राेने पुणे मेट्राेचा काेच तयार केला असून या काेचला आत्तापर्यंत पावणे दाेन लाख नागरिकांनी भेट दिली आहे.
पुणे : पुण्याच्या वाहतुक काेंडीवर ताेडगा काढण्यासाठी पुण्यात मेट्राेचा पर्याय पुढे आणण्यात आला. अनेक आक्षेपांनंतर अखेर मेट्राेचे काम सुरु झाले. सध्या शहरातील वनाझ ते रामवाडी आणि निगडी ते स्वारगेट या मार्गावरील मेट्राेचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे मेट्राेची संपूर्ण माहिती देण्यासाठी आणि मेट्राेबाबत असणाऱ्या नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी महा मेट्राेतर्फे पुणे मेट्राेचा प्रतिकात्मक काेच बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात उभारण्यात आला हाेता. 15 ऑगस्ट 2018 राेजी याचे उद्घाटन करण्यात आले हाेते. या प्रतिकात्मक काेचला आत्तापर्यंत पावणे दाेन लाख नागरिकांनी भेट दिली असून नागरिकांच्या पसंतीस हा काेच पडत आहे.
शहरात मेट्राेचे काम जाेरदार सुरु असून येत्या काही महिन्यात मेट्राेची चाचणी हाेण्याची शक्यता आहे. पुणे मेट्राेच्या सुरुवातीला अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या हाेत्या. मार्गांबाबत अनेक आक्षेप देखील नाेंदविण्यात आले हाेते. त्यामुळे नागरिकांना पुण्याची मेट्राे कशी असेल याची माहिती देण्यासाठी महा मेट्राेकडून बालगंधर्व परिसरात मेट्राेचा प्रतिकात्मक काेच तयार करण्यात आला. या काेचमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपण मेट्राेमध्ये असल्यासारखे जाणवते. या काेचमध्ये अनेक स्क्रिन्स लावण्यात आल्या असून त्यावर मेट्राेच्या सध्या सुरु असलेल्या कामाची माहिती देण्यात येत आहे. त्याचबराेबर मेट्राेच्या माेटरमनची खाेली देखील याठिकाणी तयार करण्यात आली असून त्यात गेल्यानंतर आपण माेटरमनच्या खाेलीत असल्याचा आपल्याला भास हाेताे. समाेर आपल्याला मेट्राेचा मार्ग दिसताे. त्याचबराेबर माेटरमनची केबीन ज्या पद्धतीने असते तशी रचना या काेचमध्ये करण्यात आली आहे.
त्याचबराेबर बाहेरच्या बाजूला मेट्राे स्टेशनसारखी रचना करण्यात आली असून तेथे मेट्राेच्या स्थानकांबाबतची तसेच मेट्राेच्या इतर वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली आहे. याबाबता माहिती देताना या माहिती केंद्राचे निरीक्षक दत्तात्रय नागटिळक म्हणाले, या काेचला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे. आत्तापर्यंत साधारण पावणे दाेन लाख नागरिकांनी या काेचला भेट दिली आहे. अनेक शाळांच्या सहली देखील येथे आयाेजित करण्यात आल्या आहेत. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या काेचबाबत माहिती देणारे प्रकाश चाबुकस्वार म्हणाले, नागरिकांना मेट्राेबाबत ज्या शंका हाेत्या त्या येथे आल्यानंतर दूर हाेतात. पुण्याची मेट्राे कशी असेल याचा अंदाज नागरिकांना येथे येताे. त्यामुळे नागरिकांचा विराेध कमी हाेताे. तसेच ते मेट्राेप्रवासाबाबत अधिक सकारात्मक हाेत आहेत. येथे मेट्राेबाबत संपूर्ण माहिती नागरिकांना दिली जाते. तसेच त्यांच्या शंकांचे देखील निरसन केले जाते. अनेक लाेक आवर्जुन या काेचला भेट देत असतात.