Pune Crime | चारचाकीमध्ये घेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना १५ लाखांचा दंड; सात वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 08:44 PM2023-03-10T20:44:20+5:302023-03-10T20:45:02+5:30
दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा आदेश दिला...
पुणे : चारचाकीमधून प्रवाशांना कोल्हापूर, तसेच इच्छितस्थळी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत घ्यायचं आणि पिस्तूल, हत्यारांचा धाक दाखवून लुटायचा. हा प्रकार सुरू हाेता. या प्रकरणी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना विशेष मोक्का न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा आदेश दिला आहे.
ललित दीपक खोल्लम (वय ३८, रा. मावळ), मयूर दिलीप राऊत (२८) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून १५ सप्टेंबर २०१५ च्या सुमारास अटक केली. राजू दामोदर सणगर (३८, रा. कोल्हापूर) हे कोल्हापूर येथील शिरोली येथील टेस्को इंडस्ट्रीजमध्ये ब्रांच इंचार्ज म्हणून नोकरीस होते. त्यांची मुख्य शाखा मुंबईतील ओपेरा हाउस येथे होती. तर इतर दोन शाखा पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे होत्या. ४ सप्टेंबर २०१५ रोजी कंपनीतील काम संपल्यानंतर ते एकटेच कोल्हापूर येथे जाण्यासाठी एसटीची वाट पाहत असताना त्या ठिकाणी एक व्यक्ती होती.
त्याच वेळी तेथे एक ह्युंदाई कार आली. त्यामध्ये चालकाशेजारी एक व्यक्ती बसलेली होती. कोल्हापूर येथे महालक्ष्मीला जाणार आहे, तुम्ही येणार का, म्हणत सणगर यांना १५० रुपये घेतो म्हणत लिफ्ट दिली. त्याच्या शेजारी उभा असलेला व्यक्तीदेखील कोल्हापूरला यायचंय म्हणून गाडीत बसला. दरम्यान, कार कात्रज घाटाजवळ गेली असता तेथे चालकाने कार थांबवली. त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोघे आले. त्यांनी सणगर यांना खाली उतरवत त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटून सोडून दिले.