१५ टक्केच पाणी; दोन लाख ग्रामस्थांना झळ
By admin | Published: April 19, 2016 01:07 AM2016-04-19T01:07:56+5:302016-04-19T01:07:56+5:30
जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शिल्लक पाणीदेखील झपाट्याने कमी होत आहे.
पुणे : जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शिल्लक पाणीदेखील झपाट्याने कमी होत आहे. यामुळे १० जूनपर्यंत पिण्यासाठी नक्की किती पाणी लागणार असून शिल्लक पाणीसाठा किती आहे, याबाबत अत्यंत काटेकोर नियोजन करून दोन दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पाटबंधारे विभाग आणि पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.
जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांत ऐवढी भयानक पाणीटंचाई निर्माण झाली नाही ती या वर्षी झाली़ २५ धरणांपैकी ९ धरणे पूर्णपणे कोरडी पडली असून, केवळ २६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचा थेंब-थेंब जपून वापरण्याची गरज असून, त्याचे आत्ताच नियोजन करण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर कंद यांनी सोमवारी पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग व अन्य संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेत बैठक घेतली. या बैठकीत कंद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्ह्यात सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी किती पाणी पुरवठा आवश्यक आहे, आपतकालीन परिस्थितीत किती पाणी आवश्यक आहे, याची माहिती एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट व जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत नियोजन करण्यात येणार असल्याचे कंद यांनी सांगितले.