माळशेज घाटात अडकले १५ ट्रेकर्स; चौदा सुखरूप, एकाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 10:26 AM2023-03-21T10:26:50+5:302023-03-21T10:37:29+5:30
जवळपास एक-दोन तासानंतर ४०० फूट खोल शोधाशोध केल्यानंतर त्या युवकाचा मृतदेह दिसून आला
उदापूर : माळशेज घाट परिसरात नाशिकहून आलेले १५ ट्रेकर्स खोल दरीत ट्रेकिंगसाठी उतरले होते. यापैकी सहा ट्रेकर्स दरीत अडकले होते. या सहा ट्रेकर्सपैकी एका ट्रेकर्सचा दरीत पडून मृत्यू झाला आहे.
पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या माळशेज घाटात नाशिक येथून आलेल्या किरण काळे (वय ५२) या ट्रेकर्सचा खोल दरीत पडून मृत्यू झाला, तर पाच ट्रेकर्सना वाचविण्यात यश आले आहे.
रविवारी (दि. १९) सकाळी नाशिक येथून पंधरा ट्रेकर्स माळशेज घाटात ट्रेकिंगसाठी आले होते. ते ट्रेकिंग करण्यासाठी खोल दरीत उतरले असता, त्या ठिकाणी पाच ट्रेकर्स अडकले होते. ही माहिती जुन्नर येथील शिवनेरी टेकर्स रेस्क्यू टीम यांना दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास समजली. यावेळी नीलेश खोकराळे, अनिल काशीद, अक्षय तांबे, संतोष डुकरे, अनिकेत डुकरे, अल्पेश दिघे यांनी घटनास्थळी जाऊन अडकलेल्या ट्रेकर्सला बाहेर काढण्यासाठी दिवसभर अथक प्रयत्न सुरू होते. प्रथम १०० फूट खोल अडकलेल्या १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यामधील एक मिसिंग असल्याचे समजल्यावर त्याची शोधमोहीम घेण्यात आली. जवळपास एक-दोन तासानंतर ४०० फूट खोल शोधाशोध केल्यानंतर त्या युवकाचा मृतदेह दिसून आला.