१५ वर्षीय मुलीचा शाळेतच विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार
By नितीश गोवंडे | Published: September 16, 2023 05:53 PM2023-09-16T17:53:05+5:302023-09-16T17:53:20+5:30
याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून १६ वर्षीय मुलाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : डेक्कन परिसरातील एका नामांकित शाळेमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असताना १५ वर्षीय मुलीचा तिच्याच वर्गातील एकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून १६ वर्षीय मुलाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही अनाथ असून ती लहानपणापासून बालग्राम मध्ये वास्तव्यास आहे. डेक्कन परिसरातील एका नामांकित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत ती शिक्षण घेत आहे. २४ डिसेंबर २०२२ रोजी ती शाळेत असताना तिच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या आरोपी मुलाने दुपारच्या जेवणाच्या सुटीमध्ये पाठीमागून येत तिच्या मानेवर मारले. यानंतर पीडित मुलीने याबाबत तिच्या शिक्षिकेकडे तक्रार केली. त्यानंतर पीडिता खेळण्यासाठी वर्गाबाहेर गेली असता, आरोपीने तिच्या शरीराला स्पष्ट करत ‘बाथरुम मध्ये चल’ असे म्हणत पुन्हा ‘ती’चा विनयभंग केला.
घडलेल्या प्रकारानंतर बालकल्याण समिती समोर संबंधित मुलीची चौकशी करून समुपदेशन करण्यात आले. यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कवटीकवार करत आहेत.
पाठलाग करून मुलीचा विनयभंग...
कर्वे रस्ता परिसरात एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून २४ वर्षीय मुलाने ‘तुझ्या मैत्रिणीचे नाव काय आहे’ असी विचारणा केली. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच मुलीला शिवीगाळ करत तुला उचलून नेतो अशी धमकी दिली. हा प्रकार १३ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आकाश राजेंद्र सोनटक्के (२४, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी आकाश सोनटक्के याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ओलेकर करत आहेत.