पुणे महापालिकाच उठली झाडांच्या जीवावर : रस्ता रुंदीकरणादरम्यान घेणार १५० वृक्षांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:59 PM2019-03-16T16:59:41+5:302019-03-16T17:07:11+5:30
झाडे लावा-झाडे जगवा अशा वाक्यांनी भिंती रंंगवणारी महापालिका मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल १५० झाडांचा बळी घेणार आहे.
- लक्ष्मण मोरे-
पुणे : शहरभर झाडे लावा-झाडे जगवा अशा वाक्यांनी भिंती रंंगवणारी महापालिका मात्र, गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर चौकादरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल १५० झाडांचा बळी घेणार आहे. विविध प्रजातींचे हे वृक्ष बाधित होणार असून याबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या बांधकाम साईट्स आणि लग्न, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वारपल्या जाणाऱ्या लॉन्सच्या सोईसाठीच हा घाट घातला जात असल्याचे चित्र आहे.
पालिकेच्यावतीने या रस्त्यावर ३० फुटी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी पथ विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाकडून १६ जानेवारी २०१९ रोजी नकाशासह प्रस्ताव सादर केला होता. याच कार्यालयाकडून रस्ता रुंदीकरणाच्यादरम्यान येणारे वृक्ष काढण्याबाबत वृक्ष प्राधिकरण विभागाकडून अर्ज दिला होता. त्यानुसार, महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन, सुधारणा अधिनियम १९७५ च्या कलम ८/३ अन्वये जाहीर नोटीस देण्यात आली आहे. हे वृक्ष तोडण्यास तसेच पुनर्रोपण करण्यासंदर्भात या अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, खात्यामार्फत व उच्च न्यायालयात यांनी गठीत केलेल्या तज्ञ समितीमार्फत समक्ष जागा पाहणी केली. या प्रस्तावाला महापालिका आयुक्त तथ प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव यांनी मान्यता दिलेली आहे.
खात्याने आणि तज्ञ समितीने यासंदर्भात अभिप्राय दिले आहेत. खात्याने यातील २० वृक्ष काढण्यास तसेच १३० वृक्ष पुनरोपन करण्याचा अभिप्राय दिला आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडून या रस्त्यावरील झाडांवर क्रमांक टाकण्यात आले असून प्रत्येक झाडावर नोटीस लावण्यात आलेली आहे. जवळपास दहा पानांची ही नोटीस प्रत्येक झाडावर खिळे ठोकून लावण्यात आलेली आहे. बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये सुभाभूळ, निलगिरी, वड, पिंपळ, उंबर, चींच, कदंब, करंज, अर्जून, हिरडा, बेहडा, आवळा, बदाम, फायकस, वाळवा, टरमेलीया, बकुळ, मोहगणी, पेरु, चाफा, औदुंबर, नीलमोहोर, सप्तपर्णी, खाया, आरेका पाम, कडुनिंब, पेंटाफोरम, अशोक, फिश टेल, बांबू, पेल्टोफोरम आदी प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे.
====
रस्त्याच्या रुंदीकरणासह परिसराचा विकासही आवश्यक आहे. मात्र, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनही आवश्यक आहे. पालिका याठिकाणी भूसंपादन प्रक्रिया राबवून रस्ता रुंदीकरण करु शकली असती. मात्र, येथे सुरु असलेल्या बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या साईट्स आणि बडे लॉन्स मालक यांच्या फायद्यासाठी वृक्षांचा बळी दिला जात आहे. पालिकेने वेगळ्या पयार्याचा विचार करुन या वृक्षांचे जतन करणे गरजेचे आहे. या वृक्षतोडीला आमचा विरोध आहे. आमच्या संस्थेने आक्षेप नोंदविला असून ही वृक्षतोड रद्द न केल्यास चिपको आंदोलन करण्यात येईल.
- यासीन शेख, अध्यक्ष, जयहिंद फाऊंडेशन
=====
तज्ञ समितीने दिलेल्या अभिप्रायात तीन वाळलेले वृक्ष काढण्यास शिफारस केली आहे. तर २१ वृक्ष पूर्णपणे काढण्याची आणि १२६ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची शिफारस केली आहे. चांगल्या जागेत शास्त्रीय पद्धतीने झाडे सुस्थितीत येईपर्यंत पाणी व मनुष्यबळाच्या व्यवस्थेसह पुनरोपण करावे. तसा आराखडा विभागाला सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच पथ विभागाने देशी वृक्षांना प्राधान्य देऊन प्रस्तावित रस्त्याच्या दुतर्फा आणि परिसरातील अन्य रस्त्यांच्या दुतर्फा तीन मीटरच्या अंतराने लावावेत. या झाडांभोवती सिमेंट कॉंक्रीटविरहीत आळी करुन लागवड करावी तसेच वृक्ष प्राधिकरण / उद्यान विभागाने पुनरोर्पीत व नवीन वृक्ष लागवडीची नोंद घ्यावी असेही अहवालात नमूद केले आहे.
=====
गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर चौकादरम्यानच्या १.३ किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पथ विभागामार्फत आठ महिन्यांपासून सुरु आहे. या कामामध्ये १५० वृक्ष बाधित होणार आहेत. खात्याने आणि तज्ञ समितीने दिलेल्या शिफारशीनुसार काही झाडे पदपथाच्या कडेला लावण्यात येणार आहेत. त्यांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर काही वृक्ष काढून टाकण्यात येणार आहेत. ठेकेदाराकडून वृक्षांचे पुनर्रोपण करुन घेतले जाणार आहे.
- अविनाश सकपाळ, सहायक महापालिका आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
====
बाधित होणाºया वृक्षांची आकडेवारी
वृक्षाचा प्रकार संख्या
करंज 01
वाळवा 01
बदाम 06
फायकस 05
गुलमोहोर 13
औदुंबर 02
टरमेलीया 02
बकुळ 02
मोहगणी 02
पेरु 01
चाफा 02
अरेका पाम 02
सुभाबूळ 19
खाया 03
सप्तपर्णी 08
पेंटाफोरम 14
निलगिरी 12
कडुलिंब 06
वड 01
औदुंबर 01
मुचकुंद 02
नीलमोहोर 02
बॉटल पाम 02
अशोक 02
नारळ 01
जांभूळ 01
फिश टेल पाम 11
बांबू 19
रेन ट्री 01
बुच 01
पेल्टोफोरम 01
वठलेले 03