राज्यात कोचिंग क्लासेसअभावी १५०० कोटींची उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:11 AM2020-06-08T06:11:08+5:302020-06-08T06:11:31+5:30

कोरोनाचा परिणाम : पाच लाख खासगी शिक्षक झाले बेरोजगार

1500 crore turnover due to lack of coaching classes in the state | राज्यात कोचिंग क्लासेसअभावी १५०० कोटींची उलाढाल ठप्प

राज्यात कोचिंग क्लासेसअभावी १५०० कोटींची उलाढाल ठप्प

Next

पुणे : कोचिंग क्लासेसमध्ये मार्च ते जून महिन्यात सर्वाधिक प्रवेश होतात. कोरोनामुळे राज्यातील खासगी क्लास बंद आहेत. परिणामी या काळातील सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प आहे. खासगी शिकवण्या बंद असल्याने राज्यातील सुमारे पाच लाख खासगी शिक्षकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू होणार असले तरी प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालय व खासगी क्लास सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यातून खासगी क्लासचालकही सुटलेले नाहीत. प्रामुख्याने जेईई, नीट , एमएच- सीईटी, एमपीएससी, यूपीएससी परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी पुणे, मुंबई, लातूर, नांदेड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूरसह अनेक शहरांमध्ये खासगी शिकवण्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे.
खासगी क्लास चालकांकडून वर्षभर विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी मार्च ते जून या महिन्यांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु याच काळात लॉकडाऊन जाहीर झाल्याने तीन महिन्यांपासून खासगी शिकवण्या बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि क्लास चालकांचा व्यवसाय दोन्ही ठप्प आहेत. काही खासगी क्लासेस आॅनलाईन क्लास चालवत आहेत. प्रवेशही झाले आहेत. मात्र, पालक, विद्यार्थी तितके समाधानी नाहीत.
खासगी क्लास चालकांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी राज्य शासनाने खासगी शिकवणी अधिनियम समिती स्थापन केली होती. समितीचे सदस्य बंडोपंत भुयार म्हणाले, राज्यात सुमारे १ लाख खासगी क्लासचालक असून त्यात ५ लाखांहून अधिक खासगी शिक्षक काम करत असल्याने तब्बल २५ लाख लोकांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे.
लॉकडाऊनमुळे बहुतांश लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाळा, महाविद्यालय याबरोबरच शासनाला खासगी क्लासेस सुरू करण्याबाबतचे धोरण ठरवावे लागणार आहे. त्यासाठीचे नियम, निकष तयार करावेत, अशी भूमिका क्लास चालक संघटना व्यक्त करत आहे.

आर्थिक स्थितीचा पालकांना फटका
पुणे, मुंबई, लातूर, नांदेड, नागपूर शहरांमध्ये प्रत्येकी २०० कोटींवर उलाढाल खासगी क्लासच्या माध्यमातून होते. उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुमारे ५०० कोटी रुपयांची अशी राज्यात १ हजार ५०० कोटींची उलाढाल होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीचा फटका पालकांनाही बसला आहे. परिस्थिती पाहून, काही काळानंतरच पालक मुलांना खासगी क्लासला पाठवतील, अशी शक्यता आहे.

Web Title: 1500 crore turnover due to lack of coaching classes in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.