पुरंदर विमानतळ हद्द नकाशावर १५५७ शेतकऱ्यांनी नोंदविल्या हरकती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 07:15 PM2019-08-22T19:15:19+5:302019-08-22T19:34:36+5:30
विमानतळासाठी दोन हजार हेक्टर क्षेत्र लागणार असून उर्वरित ८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत .
सासवड: पुरंदर मधील बहुचर्चित व प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अधिसूचित क्षेत्र जाहीर करून या क्षेत्राचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या सात गावातील विमानतळाच्या हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले असून त्यावर १५५७ शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत .
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर हरकती घेण्याची सुरुवात २१ जून २०१९ ला सुरू झाली होती. शेवटची मुदत दिनांक १९ ऑगस्टला संपली. त्यामध्ये गाव निहाय दाखल झालेल्या हरकती पुढील प्रमाणे पारगाव ५०१, उदाचीवाडी १२३, एखतपूर ५६, मुंजवडी ३९, कुंभारवळण १४६, खानवडी १८५, वनपुरी ५०७ अशा एकूण १५५७ हरकती दाखल झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण २८३२ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. सर्वात जास्त पारगाव येथील १०३७ हेक्टर क्षेत्र जाणार आहे. त्याच बरोबर वनपुरी येथील ३३९ हेक्टर, कुंभारवळणमधील ३५१ हेक्टर, उदाचीवाडी येथील २६१ हेक्टर, एखतपुर २७९ हेक्टर, मुंजवडी १४३ हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र विकास विमानतळ कंपनीकडून अधिसूचित करण्यात आले आहे .विमानतळासाठी दोन हजार हेक्टर क्षेत्र लागणार असून उर्वरित ८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत .
पुरंदरच्या पूर्व भागातील पारगाव., खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी या प्रस्तावित गावात आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाने या अगोदर विविध प्रकारचे चे सर्वे केले आहेत .तसेच परवानग्याही घेतल्या आहेत.याबाबत जिप चे सदस्य व विमानतळ विरोधी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांनी गेली तीन वर्षांपासून या सात गावातील बाधित शेतकऱ्यांचे सोबत वेळोवेळी मोर्चे आंदोलने रास्ता रोको करून विरोध दर्शविला असल्याचे सांगितले. तसेच मुदतीत १५५७ खातेदारांनी हरकती नोंदविल्याचे सांगितले.
———————