Saswad | सासवड नगरपालिकेचा १५७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 03:43 PM2023-03-07T15:43:00+5:302023-03-07T15:45:02+5:30
यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे व नगरपालिकेचे खाते प्रमुख उपस्थित होते...
सासवड (पुणे) : नगरपरिषदेचा सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये कोणतीही करवाढ नाही. अर्थसंकल्पाची सर्वसाधारण सभा उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. मुख्याधिकारी निखिल मोरे व नगरपालिकेचे खाते प्रमुख उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात मागील वर्षाचे शिल्लक ४ कोटी ११ लाख रुपये असून अंदाजे जमा १५७ कोटी अपेक्षित जमा धरण्यात आली आहे. महसुली खर्च व भांडवली खर्च एकूण रुपये १६१ कोटी अपेक्षित धरण्यात आला आहे. मागील शिल्लक व अपेक्षित जमा तसेच अपेक्षित खर्च विचार करता ३० लाख रूपये शिलकेचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेत पाणीपुरवठा योजनेसाठी ५० कोटी रूपये अपेक्षित निधी आहे तर भुयारी गटार योजनेसाठी ३० कोटी रूपये निधी अपेक्षित आहे.
याचबरोबर सुवर्ण जयंती महाअभियान १५ कोटी, नावीन्यपूर्ण योजना अनुदान १ कोटी, आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना २ कोटी, दलित वस्ती पाणी पुरवठा योजना २० लाख, रस्ता निधी ७० लाख, स्वच्छ महाराष्ट्र अभियान ७ कोटी, दलितेत्तर वस्ती सुधारणा अनुदान २ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान ४ कोटी, विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान ३ कोटी, तीर्थक्षेत्र विकास अनुदान १ कोटी, अपारंपारिक ऊर्जा अनुदान १.६ कोटी, विशेष रस्ता अनुदान ६ कोटी, अल्पसंख्याक योजना अनुदान २० लाख असे अपेक्षित धरण्यात आले आहे याशिवाय १५ वा वित्त आयोग ३.५ कोटी, खासदार विकास निधी ५० लाख, आमदार विकास निधी ५० लाख अपेक्षित आहे. अशी माहिती सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली.