Pune Municipal Corporation: पुण्यात भाजपचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:23 PM2022-02-02T13:23:23+5:302022-02-02T17:05:00+5:30
राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला
पुणे: प्रभाग रचनेची फोडाफोडी आणि तोडफोड ही भाजपने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. प्रशासनाने दिलेली प्रभागरचना स्वीकारणे हे आमचे पूर्वीपासूनच धोरण आहे. भाजपचे शहराध्यक्ष 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या आसपासचे लोक टिकवून ठेवावेत. सध्या आमच्याकडे त्यांच्या १६ नगरसेवकांची यादी आहे. त्यांचे प्रवेश केव्हा घ्यायचे हे वरीष्ठांशी चर्चा करून ठरवले जाईल असा खुलासा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. प्रशासनाने जाहीर केलेली प्रभाग रचना पाहता निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 122 जागा स्वबळावर जिंकू शकते. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली आहे.
महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा बहुप्रतिक्षित प्रारूप आराखडा महापालिका प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्षांनी व महापालिका सभागृहनेत्यांनी भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
निवडणूक स्वबळावर लढवणार
जगताप यांनी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना पाहता स्वबळावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका आपण शहराचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्टीकडे मांडणार आहोत. मात्र, पक्षश्रेष्टी जो निर्णय देतील तो आपणास मान्य असेल, असेही जगतात यांनी स्पष्ट यावेळी केले.