मुदत ठेवीच्या पावत्या बेकायदेशीर वर्ग करुन १६ कोटीचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:15+5:302021-01-25T04:10:15+5:30
पुणे, नशिराबादच्या मालमत्ता खरेदीत अपहार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बीएचआर प्रकरणात अटक झालेला मुख्य सूत्रधार सूरज झंवर याने ...
पुणे, नशिराबादच्या मालमत्ता खरेदीत अपहार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बीएचआर प्रकरणात अटक झालेला मुख्य सूत्रधार सूरज झंवर याने पिता सुनील झंवर व इतरांनी संगनमताने साई मार्केटींग अण्ड ट्रेडींग कंपनी या नावाने टेंडर भरल्याचे भासवून पुण्यातील निगडी, घोले रोड व नशिराबाद येथील मालमत्ता खरेदीत १६ कोटी रुपयांचा अपहार केला असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेऊन त्या बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. सूरज याला शनिवारी ( दि. २३) पुणे न्यायालयाने दि. २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीएचआरचे कोहिनूर आर्केड बल्क लॅन्ड क्र.२ निगडी, ता.हवेली येथील दुकान क्र,१६,१७,१८ व १८ ए या सात कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार करुन ही मालमत्ता २ कोठी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचा खरेदी केल्याचे भासविले, याच प्रकारे बालगंधर्व चौक, घोले रोड पुणे येथील चार व्यापारी गाळे ८ कोटीपेक्षा जास्त किमतीची केवळ ३ कोटी ११ लाख ३३ हजार १११ रुपयांना खरेदी केल्याचे भासविले. यातही अशाच प्रकारे पावत्या वर्ग करण्यात आल्या. नशिराबाद येथील दुकान क्र.१,२ व ३ हे देखील १९ लाख ५१ हजार ५१५ रुपयांना खरेदी केल्याचे भासवून अपहार केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, सूरज हा साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडिंग प्रा.लि.या कंपनीचा संचालक आहे. विविध प्रकारचे टेंडर स्वत:च्या लॅपटॉपवरुन भरायचा. श्री साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनी व श्री साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडिंग प्रा.लि. या दोघांचा पत्ता ४२, खान्देश मील शॉपींग कॉम्लेक्स, जळगाव हा एकच असून, सूरज हा एका कंपनीत भागीदार होता. दरम्यान, या गुन्ह्यात प्रकाश जगन्नाथ वाणी (ठाणे) व अनिल रमेशचंद्र पगारिया (रा.शिवराम नगर) या दोघांना ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे.
.....
साई मार्केटींगच्या खात्यातून निविदा धारकांच्या खात्यात पैसे वर्ग
साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडिंग कंपनी यांच्या खात्यावरुन निविदाधारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झालेले आहे. निविदा भरणारे लोक झंवर याच्या कार्यालयाशी संबंधित होते किंवा बाहेरचे त्यात पारदर्शकता असल्याचे भासविले जात आहे. पतसंस्थेच्या अपहाराच्या रकमेतून झंवर याने स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
.......
१२ टक्के व्याजाने हिशेब
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, महावीर जैन हा सुनील झंवर याच्या कार्यालयात येत होता व बीएचआरच्या कर्ज खात्याचे उतारे कृणाल शहाने इन्स्टॉल करुन दिलेल्या सॉफ्टवेअरमधून घेऊन ही कर्जखाती सरळव्याजाने व १२ टक्के व्याजाने हिशेब करुन देत होता.
--