अबब...! हिर्डोशी खोऱ्यात सापडला १६ फुटी अजगर; सर्पमित्रांकडून जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:13 PM2017-11-25T12:13:59+5:302017-11-25T12:19:56+5:30
तालुक्यातील निसर्गरम्य अशा हिर्डोशी गावातंर्गत असलेल्या धामणदेववाडी येथे शेळी गिळताना अजगर शेतकऱ्यांनी पाहिला. वन विभागाने अजगर पकडून बाहेर न सोडता जवळपासच सोडल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे.
भोर : तालुक्यातील निसर्गरम्य अशा हिर्डोशी गावातंर्गत असलेल्या धामणदेववाडी येथे शेळी गिळताना अजगर शेतकऱ्यांनी पाहिला. त्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडली. वन विभागाने अजगर पकडून बाहेर न सोडता जवळपासच सोडल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे.
महाड-पंढरपूर रोडपासून दोन किलोमीटर उंच डोंगरावर असलेली लहानशा धामणदेववाडीतील ज्ञानोबा गोरे नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी घेऊन जात असताना जनावरांच्या कळपातील शेळीवर अजगराने हल्ला केला. शेळीला वेटोळे मारून गिळत असताना त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थ जमा झाले; मात्र अजगराने बकरीला सोडले नाही. सुमारे ५० किलो वजनाचा आणि १६ फुटी लांब भारतीय अजगर इंडियन रॉक पायटन या जातीचा आहे.
अजगराने गिळलेली शेळी बाहेर फेकल्यावर ताहीर शेख, सूरज बल्याळ, उमेश मोरे, सचिन सावंत, विक्रांत डोईफोडे, सुबोध साळुंके, सतीश पारवे, अक्षय जाधव, मंगेश धामुणसे या सर्पमित्रांनी अजगराला कोणतीही इजा न करता लांब अंतरावर नेऊन सोडले.
मात्र, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजगराला सोडण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. सर्पमित्रांनीच अजगर बाहेर सोडला. याची कोणतीही पावती किंवा लेखी काही दिलेले नाही. दरम्यान, अजगराच्या भीतीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एक अजगर आढळला होता.
वन विभागाचे कर्मचारी जंगलात फिरकतच नाहीत
महाड-पंढरपूर रोडवर नीरा-देवघर धरणाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात जंगल असून अनेक प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे संवेदनशील भाग आहे. मात्र, सदरच्या जंगलात वनपाल श्रीमती के. यू. पाटील असून त्या कधीच या भागात येत नाहीत किंवा राहतही नाहीत. नागरिकांशी त्यांचा अजिबातच संपर्क नाही.