सांगुर्डी येथे वीज पडल्याने १६ शेळ्या-मेंढ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:27+5:302021-06-02T04:10:27+5:30
महाळुंगे: सांगुर्डी (ता. खेड) येथील शेतकरी काळे यांच्या शेतात शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्यावर वीज पडून एकूण १६ ...
महाळुंगे: सांगुर्डी (ता. खेड) येथील शेतकरी काळे यांच्या शेतात शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्यावर वीज पडून एकूण १६ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्या. तर, ४ मेंढ्या कायम अधू झाल्याची माहिती तलाठी श्याम वालेकर यांनी दिली. ही घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.
विशाल आबा कऱ्हे हे दर वर्षी सांगुर्डी परिसर व इतर ठिकाणी मेंढी व शेळ्या चारण्यासाठी येत असतात, आता परतीच्या प्रवासामध्ये जात असताना सांगुर्डी येथे मुक्कामी होते. कऱ्हे यांचा शेळ्या-मेंढ्या पालन व्यवसाय आहे. त्यांनी शनिवारी दिवसभर शेळ्या-मेंढ्यांना चारून सायंकाळी ६ च्या सुमारास काळे यांच्या शेतात वाड्यात कोंडल्या होत्या. दरम्यान, रात्री ८ च्या सुमारास अवकाळी पावसात अचानक त्यांच्या वाड्यावर वीज कोसळली. यामध्ये १६ शेळ्या-मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. चार मेंढ्या कायम अधू झाल्या. या घटनेची माहिती सरपंच वसंत भसे यांनी तलाठी श्याम वालेकर यांना दिली. त्यानंतर तलाठी श्याम वालेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शेळ्या-मेंढ्यांचा पंचनामा केला. या घटनेत मेंढपाळ विशाल आबा कऱ्हे यांचे सुमारे तीन लाख पन्नास रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढील माहिती व तपास प्रशासन करत आहे.
फोटो : वीज पडून १६ मेंढ्या जागीच ठार, तर ४ अपंग झाल्या.