शेअर मार्केटच्या नावाखाली १६ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:51 PM2018-06-04T13:51:46+5:302018-06-04T13:51:46+5:30
शेअर मार्केट कंपनीमध्ये गुंतविण्यासाठी घेतलेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरत १६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : नामांकित कंपनीत पैसे गुंतविण्याचा बहाणा करून १६ लाख १० हजार रुपये स्वत:च्या कामासाठी वापरत त्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार न-हे येथे उघड झाला आहे.याप्रकरणी एका ६० वर्षीय वृद्धाने सिंहगड पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून आदित्यराजे यशवंत देशमुख (रा. प्रोलाईफ सोसायटी, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देशमुख याने फिर्यादी यांच्याकडून २०१५ पासून १६ वाख १० हजार रुपये बोनांझा कम्युडीटी ब्रोकर्स या शेअर मार्केट कंपनीमध्ये गुंतविण्यासाठी घेतले. त्याबदल्यात त्यांना ५ ते १० टक्के मोबदला मिळण्याचे आश्वासनही दिले. मात्र प्रत्यक्षात ते पैसे कंपनीत न गुंतविता आरोपीने ते स्वत:च्या फायद्याकरता वापरले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सिंहगड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. राऊत करत आहेत.