राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात '१६ एमएम ' ७१ चित्रपटांची नव्याने भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:53 AM2018-04-25T11:53:56+5:302018-04-25T12:13:36+5:30

'१६ एम एम' चित्रपटांचा इतिहास जतन व्हावा तसेच तो भावी पिढ्यांना ज्ञात व्हावा या उदात्त हेतूने देशपांडे यांनी हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे.

'16 MM' 71 movies added in National Film Museum | राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात '१६ एमएम ' ७१ चित्रपटांची नव्याने भर 

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात '१६ एमएम ' ७१ चित्रपटांची नव्याने भर 

Next
ठळक मुद्देया ७१ चित्रपटांपैकी सुमारे ६६ चित्रपट हे रंगीत असून पाच चित्रपट कृष्णधवल त्याकाळात १६ एम एम प्रिंट्समुळे खेडोपाडी चित्रपट पोहचविण्याचे फार मोठे कार्य साध्य

पुणे:  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिन्यांत जुन्या काळातील १६ एमएम मधील ७१ चित्रपटांची नव्याने भर पडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. या ७१ चित्रपटांपैकी सुमारे पन्नास चित्रपट असे आहेत की, जे कोणत्याही स्वरूपात आतापर्यंत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे '१६ एमएम' चे हे दुर्मिळ चित्रपट म्हणजे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या दृष्टीने एक अनमोल ठेवा ठरला आहे. 
या ७१ चित्रपटांपैकी सुमारे ६६ चित्रपट हे रंगीत असून पाच चित्रपट कृष्णधवल आहेत. या चित्रपटांमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या 'वारणेचा वाघ' या गाजलेल्या कादंबरीवर आधारित असलेला 'वारणेचा वाघ'(१९७०), प्रसिद्ध कवी ग.दि.माडगूळकर यांची कथा-पटकथा आणि संवाद असलेला आणि राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला 'संत गोरा कुंभार' (१९६७) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांचा 'केला इशारा जाता जाता' (१९६५) आदी प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे तर रंगीत चित्रपटांमध्ये भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील या दिग्गज दिग्दर्शकांबरोबरच व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा'(१९७२), आणि 'चंदनाची चोळी, अंग अंग जाळी' (१९७५), 'आयत्या बिळावर नागोबा' (१९७९), 'सुळावरची पोळी' (१९८०), दादा कोंडके यांची महत्वाची भूमिका असलेला 'गनिमी कावा' (१९८१), 'नवरी मिळे नवऱ्याला ' (१९८४), 'गुलछडी' (१९८४), 'चंबू गबाळे' (१९८९), 'दे धडक बेधडक' (१९९०) आणि 'प्रतिकार' (१९९१) आदी चित्रपटांचा समावेश आहे. 


    या संग्रहात मराठीबरोबरच एकूण २९ हिंदी चित्रपटांचा समावेश असून त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचे गाजलेले 'सुहाग' (१९७९), 'अंधा कानून' (१९८३), 'नास्तिक' (१९८३) हे तीन चित्रपट तसेच 'एक दुजे के लिये' (१९८१), राज कपूर यांचा 'प्रेमरोग' (१९८२), 'घायल' (१९९०), 'बोल राधा बोल' (१९९२), 'विरासत' (१९९७) आणि 'अंदाज अपना अपना' (१९९४) आदी चित्रपटांचा समावेश आहे. 

     यासंदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, केवळ चित्रपटांची नावे लक्षात घेता हा संग्रह मोलाचा नाही तर १६ एम एम प्रिंट्सच्या दृष्टीने फार मोठा अनमोल ठेवा चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. ज्या काळात फक्त शहरांमध्ये चित्रपट पाहणे ही केवळ चैनीची बाब होती त्या काळात ग्रामीण भागात १६ एम एम प्रिंट्सच्या मदतीने चित्रपट दाखविला जात होता. आणि ग्रामीण भागातील प्रेक्षक त्याचा आनंद घेत होते. 'तंबू' किंवा 'टुरिंग टॉकीज' मध्ये १६ एम एम प्रिंट्सच्या साहाय्याने चित्रपट वितरित केला जात असल्यामुळे चित्रपट खेडोपाडी पोहचविण्याचे फार मोठे कार्य त्याकाळात १६ एम एम प्रिंट्समुळे साध्य झाले आहे. म्हणूनच '१६ एम एम प्रिंट्स' च्या चित्रपटांना चित्रपटसृष्टीत अनन्यसाधारण असे महत्व आहे. 

      गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ 'तंबू' तसेच 'टुरिंग टॉकीज' मध्ये १६ एम एम चित्रपटांच्या वितरणाचा व्यवसाय करणारे साताऱ्याचे ज्येष्ठ वितरक अण्णा देशपांडे आणि त्याचे चिरंजीव दिनेश देशपांडे यांनी त्यांच्याकडील '१६ एम एम प्रिंट्स' चित्रपटांचा हा अनमोल ठेवा नुकताच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला. '१६ एम एम' चित्रपटांचा इतिहास जतन व्हावा तसेच तो भावी पिढ्यांना ज्ञात व्हावा या उदात्त हेतूने देशपांडे यांनी हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या दृष्टीने ती नक्कीच गौरवास्पद बाब ठरली आहे.  

Web Title: '16 MM' 71 movies added in National Film Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.