हडपसर टर्मिनलवरून गुवाहाटीला १६ रेल्वे गाड्या फेऱ्या, गर्दी वाढल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:26 PM2024-04-13T12:26:43+5:302024-04-13T12:27:32+5:30
आता प्रवाशांची गर्दी वाढल्याने रेल्वे प्रशासनाला अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्या लागत आहे.....
पुणे :रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला येथून २०० ते २३० पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू आहे. त्यातही आता प्रवाशांची गर्दी वाढल्याने रेल्वे प्रशासनाला अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्या लागत आहे.
सध्या विशेष गाड्यांचा भार पुणे रेल्वे स्थानकावर पडत आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हडपसर टर्मिनलवरून गुवाहाटीकडे १६ गाड्या सोडण्यात येत आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून हडपसर टर्मिनलवरून नवीन गाडी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही नवीन गाडी हडपसर येथून गुवाहाटीसाठी सुटेल. मात्र, ही गाडी साप्ताहिक असणार आहे. मात्र, हडपसर येथे येण्यासाठी प्रवाशांसाठी आवश्यक असलेली फीडरची सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची हडपसर टर्मिनलला पोहोचणे अवघड होत असल्याने पीएमपी फिटर सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
हडपसर-गुवाहाटीसाठी १६ फेऱ्या
हडपसर-गुवाहाटी साप्ताहिक विशेष (दि. ९ मे ते २७ जून)पर्यंत हडपसर येथून दर गुरुवारी सकाळी १० वाजता गुवाहाटीसाठी सुटणार आहे. या गाडीच्या या कालावधीत आठ फेऱ्या होतील.
गुवाहाटी-हडपसर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक : ०५६१ (दि. ६ मे २४ जून)पर्यंत दर सोमवारी गुवाहाटी येथून रात्री ८:४० वाजता हडपसरसाठी सुटेल. या गाडीच्या आठ फेऱ्या होतील.