वेल्हे तालुक्यात १६ वर्षीय मुलाला सर्पदंश; गावातील आरोग्य सुविधांच्या अभावामुळे आयसीयूत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 03:21 PM2022-02-09T15:21:48+5:302022-02-09T15:21:57+5:30
गावात चांगले प्राथमिक आरोग्य केंद्र व या परिसरात गावागावात चांगले रस्ते पोहचले पाहीजेत अशी मागणी यावेळी येथील ग्रामस्थ वर्षानुवर्षे करित आहेत
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील चांदर येथील एका १६ वर्षीय विद्यार्थ्यांना सर्पदंश झाला होता त्यास वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला पुणे येथील ससुन रुग्नालयात अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. दुर्गम अशा चांदर परिसरात आरोग्याच्या सुविधांचा अभाव व दळणवळच्या सोयीचा अभाव असल्याने येथील विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी कि वेल्हे तालुक्यातील दुर्गम अशा चांदर गावातील चंद्रकांत गणपत सांगळे (वय १६) रविवार दि ६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गायी म्हैस घेऊन डोंगरात जात असताना त्याला वाटेतच सर्पदंश झाला. गावात रस्ता चांगला नसल्याने वाहतुकीची कोणतीही सोय या ठिकाणी नाही. चांदर पासुन ४० किलोमीटर अंतरावर पानशेत येथे फिरता दवाखाना उपलब्ध आहे. चांदर पासुन वेल्हे येथे उपचारासाठी चंद्रकांत सांगळे याला चांदर ते घिसर चार तास पायी चालत आणण्यात आले. त्यानंतर तेथुन पुढे एका दुचाकीवरुन त्याला वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले यावेळी सायंकाळचे पाच वाजले होते.
सकाळी ११ ते ५ हा वेळ केवळ उपचार घेण्यासाठी व रुग्णालयात येण्यासाठी लागल्याने सांगळे गंभीर झाल्याने त्याला पुणे येथील ससुन रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथील त्याची अवस्था बघुन येथील डॅाक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. वेळेत उपचार मिळाले असते तर सांगळेला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले नसते असे येथील डॅाक्टरांनी सांगितले. वेल्हे तालुक्याच्या पानशेत परिसरातील वरच्या भागात शासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील रुग्णांवर वेळेत उपचार मिळत नाहीत. असे चित्र सध्या या भागात पाहावयास मिळत आहेत.या परिसरात चांगले प्राथमिक आरोग्य केंद्र व या परिसरात गावागावात चांगले रस्ते पोहचले पाहीजेत अशी मागणी यावेळी येथील ग्रामस्थ वर्षानुवर्षे करित आहेत.