"तू केस मोकळे सोडत जा..." कामसुत्राचे फोटो दाखवून शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:26 AM2022-11-23T11:26:27+5:302022-11-23T11:30:20+5:30
ही तरूणी शिक्षकाकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी जात होती...
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : चित्रकलेचे शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकांनी 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही तरुणी या शिक्षकाकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी जात होती. मात्र "तू केस मोकळे सोडत जा, सुंदर दिसतेस, आय लव्ह यु" म्हणत या शिक्षकाने तिचा विनयभंग केला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश नानासाहेब पवार (वय 49, रा. भगवती नगर सुतारवाडी पाषाण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सोळा वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी हा मुलीचा पेंटिंग टीचर आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पाषाण परिसरात आरोपीचा आर्ट स्टुडिओ आहे. फिर्यादी या आरोपीकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी येत होत्या. 16 नोव्हेंबर रोजी फिर्यादी या स्टुडिओमध्ये एकट्या असताना आरोपीने त्यांच्या पायाला स्पर्श केला. फिर्यादी आपल्या कामात मग्न असताना त्याने स्टुडिओच्या दरवाज्याची कडी लावून घेतली आणि फिर्यादी यांना मोबाईल मध्ये कामसूत्राचे फोटो दाखवले.
त्यानंतर "तू मला खूप आवडते, तू केस मोकळे सोडत जा, मोकळे केस असताना तू खूप सुंदर दिसते" असे म्हणत फिर्यादी यांच्या पायाला आणि गालाला चिमटा घेऊन विनयभंग केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.