Pune: रिंगरोडसाठी १६०० एकरचे निवाडे जाहीर, १७२० कोटींचा मोबदला वितरित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:30 AM2023-11-21T09:30:54+5:302023-11-21T09:31:31+5:30
परिणामी पूर्व भागातील रिंगरोडसाठी भूसंपादनाला वेग येणार आहे...
पुणे : राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडसाठी पश्चिम भागातील हवेली आणि मावळ तालुक्यात सर्वाधिक भूसंपादन झाले असून आतापर्यंत सुमारे १ हजार ६०० एकरचे निवाडे जाहीर झाले आहेत. तर भूसंपदानासाठी आतापर्यंत सुमारे १ हजार ७२० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. परिणामी पूर्व भागातील रिंगरोडसाठी भूसंपादनाला वेग येणार आहे.
हा रिंगरोड मावळ, खेड, हवेली, भोर आणि पुरंदर या पाच तालुक्यांमधून जाणार आहे. यासाठी पश्चिम भागातून ३४ आणि पूर्व भागातील ४८ गावांमधील सुमारे १ हजार ७४० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यापैकी पूर्व भागातील ८८५ हेक्टर आणि पश्चिम भागातील ७१६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पश्चिम भागातील रिंगरोडची रचना (अलाईनमेंट) बदलल्याने तीन गावांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहेत. त्यात मुळशी तालुक्यातील कासार आंबोली, हवेली तालुक्यातील प्रयागधाम आणि भोर तालुक्यातील खोपी या गावांचा समावेश आहे.
रिंगरोडसाठी पश्चिम भागातील सुमारे ६३० हेक्टरचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी संमतीने २६० हेक्टर तसेच सक्तीने ३७० हेक्टर क्षेत्राचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. संमतीने २६० हेक्टर क्षेत्र ताब्यात आले आहे. त्यामुळे ६३० हेक्टर क्षेत्राचे म्हणजेच सुमारे १ हजार ६०० एकर क्षेत्राचे भूसंपादन झाले आहे. त्यामुळे रिंग रोडच्या पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ६३० हेक्टरसाठी १ हजार ७२० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना वितरित केला आहे.
पूर्व रिंगरोडसाठी ४८ गावांमधील जागा संपादित करण्यात येणार आहे. मावळमधील ११, खेडगावमधील १२, हवेलीतील १५ आणि पुरंदर तालुक्यातील ७ आणि भोरमधील तीन अशा गावांमधून जात आहे. त्यापैकी खेडमधील १२ आणि हवेली तालुक्यातील चार अशा १६ गावांचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. त्या गावांच्या अंतिम निवाड्याद्वारे ३९७.१६ हेक्टर जागेचे निवाडे जाहीर केल्याने त्या जागेचे संपादन केले जाणार आहे. पश्चिम भागातील सोळाशे एकर जमिनीचे निवाडे जाहीर झाल्याने पूर्व भागातील भूसंपादनालाही आता गती येणार आहे.
पश्चिम भागातील रिंगरोडसाठी हवेली आणि मावळ तालुक्याने भूसंपादनात आघाडी घेतली आहे. हवेली तालुक्यात पश्चिम भागासाठी २१४ हेक्टर क्षेत्राचे संपादन करावे लागणार आहे. त्यापैकी १०८ हेक्टरचे संपादन झाले आहे. तर मावळ तालुक्यात १२० हेक्टरपैकी ६७ हेक्टरचे संपादन झाले आहे. त्यामुळे संपादनाच्या तुलनेत मावळ तालुक्यात ५५ टक्के तर हवेली तालुक्यात ५० टक्के संपादन झाले आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी मावळ, हवेली तालुक्याने आघाडी घेतली आहे.
जिल्हा प्रशासनाने रिंगरोडसाठी सुमारे १ हजार ६०० एकर जमीन संपादनाचे निवाडे जाहीर केले आहेत. त्यात २७० हेक्टर हे संमतीने संपादित करण्यात आले आहेत. तर ३७० हेक्टर सक्तीने संपादित करण्यात येणार असून त्याचे निवाडे जाहीर करण्यात आले आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
हवेली तालुक्यातून रिंगरोडचा पूर्व आणि पश्चिम भाग जात आहे. त्यासाठी पश्चिम भागातील १०३ हेक्टर तसेच पूर्व भागातील ४४.१५ हेक्टरचे संपादन करण्यात आले आहे. त्यासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ६४४ कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. उर्वरित भूसंपादन वेगाने सुरू आहे.
- संजय आसवले, उपविभागीय अधिकारी, हवेली