जिल्ह्यातील १६३० विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:42+5:302021-06-29T04:09:42+5:30
विद्यालय स्तरावर ३५५ अर्ज प्रलंबित; बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे पुणे : समाज कल्याण विभागातर्फे एससी संवर्गातील विद्यार्थ्यांना ...
विद्यालय स्तरावर ३५५ अर्ज प्रलंबित; बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे
पुणे : समाज कल्याण विभागातर्फे एससी संवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जात असून, पुणे जिल्ह्यातील ३२ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, केवळ १ हजार ६३० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप वितरित झाली नाही. तर केवळ ३५५ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.
शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये पुणे जिल्ह्यातील एससी संवर्गातील ४५ हजार ९१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला. त्यातील ८ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी स्वतःलाच अर्ज रद्द केला. शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थात्मक स्तरावरून जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आले. काही महिन्यांपूर्वी शिष्यवृत्तीचे अर्ज संस्थात्मक पातळीवर प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत होते. परंतु, उच्च शिक्षण विभागाने संस्थात्मक पातळीवर अर्ज प्रलंबित ठेवल्यास संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्य व संचालकांवर कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे संस्थात्मक पातळीवर अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता मोठ्या स्वरूपात तक्रारी प्राप्त होत नाहीत.
उच्च शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास वेळोवेळी मुदतवाढ दिल्यामुळे तसेच बँक खाते आधार लिंक करण्यात याच्या सूचना केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली आहे. काही कारणास्तव शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून त्रुटी राहून गेल्यामुळे किंवा बँक खाते आधार लिंक नसल्यामुळेच शिष्यवृत्तीची रक्कम जमा होत नाही, परंतु, याबाबत आवश्यक कार्यवाही करून संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
---------------------------------
समाज कल्याण विभागाकडून महाडीबीटी पोर्टल अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम विना-अडथळा बँक खात्यात जमा होत आहे. केवळ आधार लिंक नसलेल्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होत नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत फारशा तक्रारी नाहीत.
- दुर्गेश विटोरे, विद्यार्थी
------------------
* एससी प्रवर्गातील किती अर्ज ऑनलाईन सादर : ४५,०९१
* किती विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र : ३९,७२६
*समाजकल्याण विभागाने निकाली काढले : ३४,७९४
*महाविद्यालय स्तरावर किती अर्ज प्रलंबित : ३५५
*किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली : ३२,८६६
*किती विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही: १,६०३