बैलाच्या हौसेसाठी मोजले तब्बल साडेसोळा लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 12:37 PM2019-11-23T12:37:05+5:302019-11-23T12:38:27+5:30
एका शेतकऱ्याने बैलाची आवड, त्यावर असलेले प्रेम आणि जिव्हाळ्यापोटी मोजले तब्बल साडेसोळा लाख रुपये
शिक्रापूर : शेतकऱ्याचा आवडता मित्र म्हणजे बैल. शेतीकामात नेहमी मदतीला येणारा... बळीराजाच्या सुख-दु:खात कायम सोबत असणाऱ्या बैलाला आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत खूप महत्त्व आहे. आजच्या तांत्रिक युगात बैलाचे महत्त्व कमी होत असताना मात्र मावळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने बैलाची आवड, त्यावर असलेले प्रेम आणि जिव्हाळ्यापोटी तब्बल साडेसोळा लाख रुपये मोजले आहेत. एवढेच नाही तर वाजतगाजत या बैलाची मिरवणूक काढत त्याला शेतकऱ्याने घरी आणले. त्याच्या या हौसेची सर्वत्र चर्चा होत आहे.
नवलाख उंबरे मावळ येथील पंडितमामा जाधव असे या हौशी शेतकऱ्याचे नाव आहे. पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथील शेतकरी अमोल दगडू जाधव व लोहगाव येथील हरीशेठ पवार यांना असलेल्या बैलांची आवड व त्यांचा सांभाळ करण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट घेत चांगल्या तयार केलेल्या बैलांना चांगली किंमत मिळत आहे. यांच्याकडे असलेल्या मॅगीनामक बैलाला पंडितमामा जाधव यांनी तब्बल १६ लाख ५१ हजार रुपये मोजल्याने हा बैल सध्या या भागात चर्चेचा विषय ठरला आहे.
शेतकऱ्यांच्या आवडत्या शर्यती न्यायालयाच्या बंदीमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. मात्र, भविष्यात ही बंदी उठून पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू होतील, या आशेत आजही अनेक शेतकरी आहेत. शर्यतबंदी असतानाही या बैलांना भार न समजता त्यांचा चांगला सांभाळ करणारे शेतकरी आहेत. या बैलगाडा शौकिनांसाठी अमोल जाधव व हरीशेठ पवार जातिवंत बैलाची निर्मिती करीत आहेत. त्यांनी सांभाळलेल्या मॅगी या बैलाची तब्येत, नजर आणि धावण्याची लकब लक्षात घेऊन नवलाख उंबरे मावळ
येथील पंडितमामा जाधव या शेतकºयाने या बैलाला १६ लाख ५१ हजार रुपये मोजत त्याला पाबळ येथून वाजतगाजत घरी नेले.