Pune: नितीन म्हस्के खून प्रकरणातील १७ आरोपींना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
By नितीश गोवंडे | Published: August 18, 2023 06:25 PM2023-08-18T18:25:25+5:302023-08-18T18:27:30+5:30
पुणे जिल्ह्यातील चौफुला आणि विश्रांतवाडी परिसरातून १७ आरोपींना शुक्रवारी जेरबंद केले...
पुणे : मंगला टॉकीज समोर १५ ऑगस्टच्या रात्री नितीन मोहन म्हस्के (३५, रा. ताडीवाला रोड) या तरुणाचा टोळक्याकडून तलवार, कोयता, लोखंडी गड आणि दगडाने निघृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कर्नाटकातील हुडगी या गावातून, पुणे जिल्ह्यातील चौफुला आणि विश्रांतवाडी परिसरातून १७ आरोपींना शुक्रवारी जेरबंद केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
सागर ऊर्फ यल्ल्या ईराप्पा काेळानट्टी (३५), सुशील अच्युतराव सुर्यवंशी (२७), शशांक ऊर्फ वृषभ संताेष बेंगळे (२१), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (२८), मलेश ऊर्फ मल्ल्या शिवराज काेळी (२४), किशाेर संभाजी पात्रे (२०), साहिल उर्फ सल्ल्या मनाेहर कांबळे (२०), गणेश शिवाजी चाैधरी (२४), राेहित बालाजी बंडगर (२०, सर्व रा. ताडीवाला राेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांचा एक विधिसंघर्ष ग्रस्त मुलाला देखील याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आराेपींविराेधात मयत नितीन महस्के याचा मित्र सतिश आनंदा वानखेडे याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
घटनेच्या दिवशी नितीन म्हस्के हा मंगला टाॅकीज येथे रात्रीचा सिनेमा पाहून दुचाकीवर पाठीमागे बसून मित्रासाेबत घरी जात हाेता. त्यावेळी टाॅकीज बाहेर दबा धरून बसलेल्या त्याच्या वस्तीतील आराेपींनी धारदार शस्त्रासह येत माेटारसायकलवरुन नितीन म्हस्के व त्याचा मित्र सतिश वानखेडे यांना रस्त्यावर पाडले. त्यानंतर म्हस्केवर जीवघेणा हल्ला कर त्याचा निघृण खून केला व आराेपी पसार झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्या मार्फत माहिती घेत गुन्ह्यातील मुख्य आराेपी सागर यल्ल्या व त्याचे साथीदार हे लातुर, साेलापूर, काेल्हापूर, पुणे ग्रामीण व पुणे शहर परिसरात तसेच कर्नाटक येथील हुडगी, बेळगाव मध्ये असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथके रवाना झाली हाेती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या नेतृत्वात कर्नाटकला गेलेल्या पथकाने दुर्गम भागातून पाच आराेपींना अटक केली. तर उर्वरित पाच आराेपी पुण्यातील विश्रांतवाडी, पुणे ग्रामीण मधील चाैफुला येथून जेरबंद करण्यात आले.
याशिवाय दाेन आराेपी विवेक भाेलनाथ नवघणे (२५, रा. रामवाडी) व इम्रान हमीद शेख (३१, रा. केशवनगर) यांना पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांचे पथकाने मुंढवा परिसरातील केशवनगर मधून अटक केली. आकाश सुनील गायकवाड (२२,रा.उत्तमनगर,पुणे) या आराेपीला पोलिस निरीक्षक अशाेक इंदलकर यांचे पथकाने खडकवासला परिसरात अटक केली. तर, लाॅरेन्स राजू पिल्ले (३६), मनाेज विकास हावळे (२३), राेहन मल्लेष तुपधी (२३) आणि विकी काशीनाथ कांबळे (२२, रा. ताडीवाला राेड) यांना खराडी, कल्याणीनगर भागातून अटक करण्यात आली आहे.दरम्यान आराेपींच्या ताब्यातून चार माेटारसायकल व पाच माेबाइल असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले दहा आराेपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.