पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: December 24, 2023 05:00 PM2023-12-24T17:00:04+5:302023-12-24T17:00:14+5:30
महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले
पुणे: पार्ट टाइम जॉब करून चांगला परतावा मिळवा, असे सांगून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मुंढवा परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने शनिवारी (दि. २३) पोलिसांना फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, १ सप्टेंबर २०२३ ते ४ सप्टेंबर २०२३ यादरम्यान हा प्रकार घडला आहे. व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने महिलेला संपर्क साधला. पार्ट टाइम जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत का असे विचारले. महिलेने इच्छुक असल्याचे सांगितल्यावर टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. त्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. त्यांनतर वेगवेगळी करणे सांगून महिलेला १७ लाख ४० हजार रुपये गुंतवण्यासाठी भाग पाडले. काही कालावधीनंतर पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर महिलेने विचारणा केली. कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी अज्ञात मोबाइल क्रमांकधारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत.