Pune Crime: नोकरी सोडली, लॉगइन करून कंपनीला १७ लाखांचा चुना
By भाग्यश्री गिलडा | Published: February 3, 2024 06:43 PM2024-02-03T18:43:25+5:302024-02-03T18:44:18+5:30
या प्रकरणी अमरजित सिंग कुलवंत सिंग (वय ३४, रा. अमृतसर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : ‘ट्रॅव्हल कंपनीच्या नावे तिकिटे घेऊन कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमरजित सिंग कुलवंत सिंग (वय ३४, रा. अमृतसर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, निखिल देविदास फाटकार (वय ३६, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २७ नोव्हेंबर २०२२ ते १७ डिसेंबर २०२२ यादरम्यानच्या काळात हा प्रकार घडला आहे. फिर्यादी हे ट्रॅव्हल कंपनीमध्ये कामाला आहेत. अमरजित सिंग हा काम सोडून गेल्यावर राजीनामा दिल्यानंतरही कंपनीच्या नावावर तिकिटे विकत होता.
दरम्यान, त्याने जुना लॉगइन आयडी वापरून कंपनीच्या सॉफ्टवेअरचा अनधिकृत वापर करत तब्बल १७ लाख ८८ हजार रुपये किमतीची ११ तिकिटे विकली. या तिकिटांसाठी त्याने कंपनीच्या बँक खात्यात असलेली रक्कम वापरली. कंपनीची परवानगी न घेता परस्पर तिकिटांची विक्री केल्याने अमरजित सिंग याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक डगळे करत आहेत.