तिसऱ्या फेरीमध्ये १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 08:52 PM2018-07-31T20:52:18+5:302018-07-31T20:57:15+5:30
आतापर्यंत तिन्ही फेऱ्यात मिळून ४७ हजार ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.मात्र, अद्यापही २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
पुणे : केंद्रीय पध्दतीने राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत १७ हजार १५२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.आतापर्यंत तिन्ही फेऱ्यात मिळून ४७ हजार ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश महाविद्यालयस्तरावर होत आहेत. मात्र अद्यापही २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने आॅनलाइन पार पडत आहेत. प्रवेश समितीकडे ७५ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या व दुसऱ्या फेरीत मिळून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २९ हजार ८८० होती. त्यानंतर तिसऱ्या फेरीत १७ हजार १५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५ हजार ७४६ इतकी आहे. तिसºया फेरीच्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेणे आवश्यक आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी ७ आॅगस्ट रोजी जाहीर केली जाईल. त्यानंतर या फेरीचे कटआॅफ व रिक्त जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अल्पसंख्यांक महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने न पार पाडता त्या त्या महाविद्यालयांच्या स्तरावर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर ५७ अल्पसंख्यांक महाविद्यालयांच्या १८ हजार जागा त्यांना हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठयाप्रमाणात बदल झाले आहेत.