१७ वर्षीय मुलीची आत्महत्या : सावत्र वडीलांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:01 PM2019-01-23T22:01:20+5:302019-01-23T22:04:05+5:30
१७ वर्षीय मुलीच्या हातात मोबाईल पाहिल्यानंतर सावत्र पित्याने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या मुलीने घरात फास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार हांडेवाडी रोडला उघडकिस आला आहे.
पुणे : १७ वर्षीय मुलीच्या हातात मोबाईल पाहिल्यानंतर सावत्र पित्याने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या मुलीने घरात फास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार हांडेवाडी रोडला उघडकिस आला आहे. याप्रकरणी तिच्या सावत्र वडीलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वेदिका बडदे (१७, हांडेवाडी रोड हडपसर ) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. तर प्रीतम संजय बडदे (३७, रा. हडपसर) याच्याविरोधात दिप्ती बडदे (३६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
दिप्ती बडदे यांनी पहिल्या पतीला घटस्फोट देऊन प्रीतम बडदे याच्याशी लग्न केले होते. वेदिका ही पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. प्रीतम बडदे याच्याशी त्यांचे लग्न २००६ साली झाले होते. तेव्हापासून प्रीतम बडदे हा तिला स्वत:च्या मुलीप्रमाणे वागवत नव्हता. तसेच तो तिला मोबाईल वापरू देत नव्हता. प्रीतम बडदे हा तिला व दिप्ती यांना वेळोवेळी मारहाण करणे, धमकावणे असे प्रकार करत होता. मुलीने मोबाईल वापरला तर ती गैरप्रकार करेल असा त्याचा समज होता. १६ जानेवारी रोजी वेदिकाजवळ त्याला एक मोबाईल मिळाला. त्यामुळे त्याने तिला त्याच्या दुकानासमोरच सर्वांसमक्ष शिवीगाळ करत मारहाण केली होती.त्यानंतर मोबाईल पुन्हा दिसला तर खून करेन अशी धमकीही दिली. याचा धक्का बसल्याने आलेल्या नैराश्यातून वेदिका हिने १७ जानेवारी रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी.राऊत आणि पोलीस करत आहेत.