"आज तुला खल्लास करतो..." एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:57 PM2022-12-15T12:57:45+5:302022-12-15T12:57:53+5:30
प्रेमाला नकार दिल्याने आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी होती
पुणे/किरण शिंदे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर या तरुणीच्या अल्पवयीन मैत्रीणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. 13 डिसेंबरच्या रात्री फुरसुंगीतील हरपळे वस्तीत हा प्रकार घडला. आशिष मारुती धनके (वय 24, हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करण्याचा उद्देशाने आरोपीने वारंवार तिचा पाठलाग केला. तिने प्रेमाला नकार दिल्याने आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान फिर्यादी तरुणीने हा सर्व प्रकार आरोपीच्या पत्नीला सांगितल्याने आरोपी आणखी चिडला.
त्याने फिर्यादी तरुणीच्या घरात जबरदस्तीने घुसून त्याने "आज तुला खल्लास करतो, तुला जिवंत सोडणार नाही" असे बोलून हा त्यातील कोयत्याने वार केला. सुदैवाने फिर्यादी तरुणीने हा वार चुकवला. त्यानंतर आरोपीने आपला मोर्चा फिर्यादीच्या मैत्रिणीकडे वळवला. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत विनयभंग केला. हडपसरपोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.