जिल्ह्यात १ लाख ७० हजार शेतक-यांना कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:40 PM2018-06-28T13:40:09+5:302018-06-28T13:47:11+5:30
सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीला वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात सरकार, प्रशासन आणि शेतकरी या सर्वांच्या बाजूने बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे,त्यामुळे या कर्जमाफीची खरे लाभार्थी आणि अपेक्षार्थी यांची संख्या अजूनतरी खात्रीपूर्वक समोर आलेली नाही.
पुणे: राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयातून २ लाख ९८ हजार ५६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) १ लाख ७० हजार ४३० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५७ हजार ८७.०१ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि खासगी बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ प्राप्त झाला आहे.
राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला एक वर्ष पूर्ण होत आहे. आॅनलाईन अर्ज भरून आॅनलाईन पध्दतीनेच कर्जाची रक्कम खात्यामध्ये जमा होत असल्याने त्यात पारदर्शकता आणली जात आहे, असे शासनातर्फे सांगितले जात आहे.मात्र,त्यास विलंब होत असल्याने शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ५६ अर्ज आले होते. त्यांपैकी पीडीसीसी बँकेचे १ लाख ११ हजार थकबाकीदार आणि १ लाख १८ हजार प्रोत्साहनपर लाभार्थी होते, तर व्यावसायिक आणि खासगी बँकांचे ६९ हजार ५६ लाभार्थी होते. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी २ हजार ३० कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली होती.
----------------------
जिल्ह्यात दौंड,इंदापूर, शिरूर ,बारामती तालुक्यातील अधिक शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पीडीसीसी बँकेचे १ लाख ११ हजार थकबाकीदार आणि १ लाख १८ हजार प्रोत्साहनपर लाभार्थी होते. त्यातील ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या ५१ हजार ६७१ शेतक-यांना २८ हजार ८१.१२ लाख रुपयांची मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ११ हजार ६४४ शेतकऱ्यांना ११ हजार ५५९ लाख रुपयांची एक वेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट- ओटीएस) कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या १ लाख ७ हजार ११५ शेतकऱ्यांना १७ हजार ४४६.८९ लाख रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ७० हजार ४३० शेतक-यांना ५७ हजार ८७.०१ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे,असे सहकार विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.