तोडफोड, जाळपोळ प्रकरण : मराठा आरक्षण बंदमधील १७० आंदोलकांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:49 AM2018-08-15T01:49:25+5:302018-08-15T01:49:43+5:30
तोडफोड व जाळपोळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठा समाजातील १७० आंदोलकांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. क्रांती दिनी शहरात ठिकठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
पुणे - तोडफोड व जाळपोळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठा समाजातील १७० आंदोलकांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. क्रांती दिनी शहरात ठिकठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी १७० आंदोलकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्यात दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजर राहणे, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू नये, न्यायालयाने परवानगी दिल्याशिवाय जिल्ह्यातून बाहेर जाऊ नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची घोषणा करण्यात आली होती. या बंददरम्यान वारजे माळवाडी, बंडगार्डन, कोथरूड आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये १७० जणांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा बार असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार मंगळवारी एकाच सत्र न्यायालयात सुनावणी झाली. तसेच, दाव्याची सुनावणी एकाच सत्र न्यायालयात होणार आहे. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी मंगळवारी (दि. १४) आणखी
६ जणांना अटक केली आहे.