कॉसमॉस बँक सायबर दरोडाप्रकरणी १७०० पानांचे दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 04:00 AM2018-12-11T04:00:55+5:302018-12-11T04:03:28+5:30
कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा दरोडा घातल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात १७०० पानी दोषारोपपत्र दाखल केले.
पुणे : कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा दरोडा घातल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात १७०० पानी दोषारोपपत्र दाखल केले. सायबर गुन्हे शाखेकडून विशेष न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
११ व १३ ऑगस्ट रोजी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे जगभरातील २८ देशांतून; तसेच भारतातील विविध शहरांमधून क्लोन केलेल्या व्हिसा कार्ड व रुपे कार्डद्वारे ९४ कोटी ४२ लाख रुपये काढून दरोडा घालण्यात आला होता़ याप्रकरणी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते़ या तपास पथकाने कोल्हापूर येथे तपास केल्यावर या गुन्ह्यातील एटीएममधून पैसे काढणाऱ्यांचा छडा लागला होता.
फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी) याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर फहिम अझीम खान (वय ३०, रा. सीमा हॉस्पिटल मागे, औरंगाबाद), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. आयेशा मस्जिदजवळ, मिर्झा कॉलनी, सिल्लोड, औरंगाबाद), महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, ता. भोकर, जि. नांदेड) तसेच नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, साईकृपा अपार्टमेंट, नारंगी रस्ता, विरार ईस्ट, मूळ रा. कुलीना, ओरिसा), मोहम्मद सईद इक्बाल हुसेन जाफरी उर्फ अली (वय ३०, रा. घर नं. २६, हमालवाडा, दर्गा रस्ता, भिवंडी), युस्टेस अगस्टीन वाझ उर्फ अँथनी (वय ४१, मजाद, जोगेश्वरी ईस्ट मुंबई), रफिक जलाल अन्सारी (वय ३४), अब्दुल्ला अफसर अली शेख (वय २८, दोघेही रा. शॉप नं ४ स्टँडस्टोन सोसायटी, मीरा रोड, ठाणे) अशी ९ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ त्यांनी कोल्हापूर व अजमेर येथून पैसे काढले होते.
सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकातील पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि पथकाने तपास केला़ अटक करण्यात आलेल्या आरोपींना पैशांचे आमिष दाखवून त्यांनी बनावट डेबिट कार्डचा वापर करून मुंबई, कोल्हापूर भागातील एटीएम केंद्रातून काही रोकड काढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सायबर गुन्हे शाखेकडून या प्रकरणात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे़ परदेशातील आरोपींना भारतात आणण्यासाठी पुणे पोलीस केंद्रीय गृह मंत्रालय व परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने इंटरपोलशी संपर्कात आहेत़ त्यांच्यामार्फत त्यातील प्रमुख सूत्रधारांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.