विशेष फेरीतून १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:23+5:302020-12-30T04:14:23+5:30
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविलीजात आहे. सोमवारी पहिल्या विशेष ...
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविलीजात आहे. सोमवारी पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रसिध्द केली. या फेरीतून प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केलेल्या २० हजार ३४७ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ७२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना येत्या २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
राज्य शासनाने एसईबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस संवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर शिक्षण विभागाने पहिली विशेष फेरी राबविण्यासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिध्द केले.या फेरीतून १७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असला तरी २ हजार ६२५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही.विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, त्यांनी प्रवेश अर्जात भरलेले पसंतीक्रम आणि महाविद्यलायाचा कटऑफ यांचा मेळ बसत नसल्याने त्यांना प्रवेश मिळू शकले नाही, अशी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेष फेरीतून १२ हजार ३०६ विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले तर १ हजार ४०५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि १ हजार २७० विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
---
विशेष फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
कला शाखा मराठी माध्यम : ७०१
कला शाखा इंग्रजी माध्यम : ५४८
वाणिज्य शाखा मराठी माध्यम : १,६०१
वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यम : ५,६५४
विज्ञान शाखा : ८,७७९
एचएसव्हीसी :३९९