डिसेंबरमध्ये मद्यविक्रीतून राज्याला १७२ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 04:40 AM2018-01-03T04:40:42+5:302018-01-03T04:40:57+5:30
महामार्गापासून पाचशे मीटर अंतरात मद्यविक्रीबंदीमुळे गेले वर्ष गाजले. अर्थातच मद्यविक्रीवर त्याचा विपरित परिणाम झाला. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत मद्याचा खप सुमारे ६५ लाख लीटरने कमी झाला होता.
पुणे - महामार्गापासून पाचशे मीटर अंतरात मद्यविक्रीबंदीमुळे गेले वर्ष गाजले. अर्थातच मद्यविक्रीवर त्याचा विपरित परिणाम झाला. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत मद्याचा खप सुमारे ६५ लाख लीटरने कमी झाला होता.
डिसेंबर महिन्यात मद्यविक्री वाढून तब्बल १७२.६१ कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाल्याने गेल्या वर्षीची सरासरी गाठू, असे राज्य उत्पादनशुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
मद्यविक्रीतून आॅगस्ट २०१६मध्ये ११६.५६, तर आॅक्टोबरमध्ये १३५.५७ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले.
त्या तुलनेत आॅगस्ट २०१७मध्ये ८७.६६ आणि आॅक्टोबरमध्ये १२८.८४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. म्हणजेच आॅगस्ट, आॅक्टोबर २०१७मध्ये अनुक्रमे २८.९० आणि ६.७२ कोटी रुपयांची तूट नोंदविण्यात आली.
मद्यविक्रीचे एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ अखेरचे आकडे पाहिल्यास, ६४.३६ लाख लीटर देशी दारू, बीअर आणि इतर मद्याचा खप कमी झाला आहे.
देशी मद्याच्या खपात १२.६३ टक्के, विदेशी मद्याच्या खपात
१३.७२ टक्के आणि बीअरच्या खपामध्ये २९.७२ टक्के घट नोव्हेंबरपर्यंत नोंदविण्यात आली आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक सुनील फुलपगार यांनी सांगितले.