कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:37 IST2018-06-17T04:37:34+5:302018-06-17T04:37:34+5:30
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या चौकशीस नेमलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे आतापर्यंत १७७ शपथपत्रे विविध व्यक्ती, संघटनांनी दाखल केली आहेत.

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे
पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या चौकशीस नेमलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे आतापर्यंत १७७ शपथपत्रे विविध व्यक्ती, संघटनांनी दाखल केली आहेत. शपथपत्र दाखल करण्यासाठी आयोगाने मुदत वाढवून दिली असून, आता १६ जुलैपर्यंत शपथपत्रे आयोगाकडे सादर करता येणार आहे.
कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या चौकशीस शासनाने चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे़ एऩ पटेल आणि राज्याचे मुख्य सचिव यांची चौकशी समिती फेबु्रवारी महिन्यात नेमली. या समितीस चार महिन्यांत अहवाल द्यायचा आहे़ चौकशी आयोगाने १२ मे रोजी जाहीर आवाहन करुन ती घटना, त्या घटनेपूर्वीच्या आणि त्यानंतरच्या अशा इतर संबंधित घटना या बद्दलची व्यक्तीगत माहिती असलेल्या व्यक्ती, त्या घटनेमुळे बाधित व्यक्ती, संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून शपथपत्राच्या स्वरुपात त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी १० जूनपर्यंत मुदत होती. या मुदतीत आयोगाकडे पुणे कार्यालयात १६९ शपथपत्रे तर मुंबईतील कार्यालयात ८ शपथपत्रे सादर झाली. पण मुदतीत शपथपत्र सादर न करता आल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी अनेकांनी केली होती.