१८ ते ४५ वयोगटाला ‘या वेळी’ मिळेल लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:19+5:302021-03-13T04:21:19+5:30
चौथा टप्पा : कोरोना लसीकरण प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना साथीच्या संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लसीकरण प्रक्रियेचा ...
चौथा टप्पा : कोरोना लसीकरण
प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना साथीच्या संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढवला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरणाचा चौैथा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. चौैथ्या टप्प्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाला पात्र नागरिक आणि लसींची उपलब्धतेचा विचार करुन निर्णय घेणे हिताचे ठरेल, असे वैैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साथीची ही दुसरी लाट असून एप्रिलपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने वाढणार असल्याचा अंदाज आहे. सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही, लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, लसींची उपलब्धता आणि लसीकरणास पात्र व्यक्ती यांचे समीकरण जुळेनासे झाले आहे.
आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होण्याआधीच ४५ ते ५९ मधील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. लसींच्या डोसची कमतरता निर्माण होत आहे. १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या, लस कंपन्यांची उत्पादन क्षमता, आधीच्या तिन्ही टप्प्यातील प्रत्येक लाभार्थींसाठी दोन डोसचे नियोजन या सर्व निकषांचा विचार करुनच केंद्र सरकारला नियोजन करावे लागणार आहे.
-----------------------
कोरोना कृती समितीने लसीकरणाच्या चौैथ्या टप्प्याला सुरुवात करण्याची विनंती सरकारला केली आहे. केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन केल्यास लसीकरणाचा वेग वाढवता येऊ शकतो.
- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य
-----------------------
४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांची भारतातील संख्या सुमारे ३० कोटी आहे. त्यापैैकी केवळ १० टक्के लोकांचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे. ९० टक्के नागरिक अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. या वयोगटातील १०० टक्के नागरिकांसाठी पुरतील इतके डोस आहेत का, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे लसींची उपलब्धता लक्षात घेऊन आधी तिसरा टप्पा संपवावा. त्यानंतर ४५-५९ वयोगटातील कोणतीही व्याधी नसलेल्या व्यक्ती, त्यानंतर १८ ते ४५ मधील व्याधीग्रस्त व्यक्ती आणि मग १८ ते ४५ मधील सामान्य व्यक्ती असे नियोजन करावे लागेल.
- डॉ. संजय ललवाणी, वैैद्यकीय संचालक, भारती विद्यापीठ रुग्णालय
----------------------
मागील तीन दिवसांपासून भारतात सुमारे ३० लाख लोकांना लसीकरण केले जात आहे. प्रत्यक्षात, दररोज ७० लाख ते १ कोटी इतके लसीकरण केले जाणे आवश्यक आहे. ४५ वरील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक या वयोगटात कोरोनाचे गांभीर्य वाढण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना झाला तरी बहुतांश वेळा तो सौम्य असतो आणि ते गृह विलगीकरणात बरे होतात. त्यामुळे पुढील महिन्याभरात लसीकरणाचा तिसरा टप्पा संपवावा लागेल. त्यानंतर चौैथा टप्पा सुरु करता येईल. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनप्रमाणेच स्फुटनिक-व्हीचा समावेशही करता येईल. तोपर्यंत इतर लसींच्या मानवी चाचण्यांचे टप्पे पूर्ण करुन त्यांचे उत्पादन सुरु करता येऊ शकते.
- डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ