पुण्यात तब्बल १८ तासांच्या कडक पोलीस बंदोबस्ताला लागले गालबोट; उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला
By विवेक भुसे | Published: August 4, 2022 10:23 AM2022-08-04T10:23:12+5:302022-08-04T10:23:27+5:30
शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादातून निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता
पुणे : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचा पुणे शहरातील हा तसा अधिकृत पहिलाच दौरा. दिवसभरात तब्बल १४ ठिकाणांना भेटीगाठी, बैठका, उद्घाटन अशी कार्यक्रमांची रेलचेल होती. त्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादातून निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अगदी सकाळी ७ वाजल्यापासून मुख्यमंत्री रवाना हाेईपर्यंत म्हणजे मध्यरात्री दीड वाजेपर्यंत (तब्बल १८ तास) कडक पोलीस बंदोबस्ताला उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्यामुळे गालबोट लागले.
मुख्यमंत्री शिंदे हे मुंबईतील मलबार हिलवरील निवासस्थानाहून सकाळी साडेआठ वाजता पुण्याकडे निघाले. रस्त्यामार्गे ते पुण्यात येत असल्याने सकाळी ७ वाजल्यापासूनच रोडवर बंदोबस्त लावण्यात आला होता. विभागीय आयुक्त कार्यालयातील आढावा बैठकीनंतर फुरसुंगी पाणी योजना प्रकल्प पाहणी केल्यानंतर ते सासवडला गेले. त्यामुळे काही वेळ पुणे शहरातील बंदोबस्तावरील पोलिसांना विश्रांती मिळाली. त्यानंतर सायंकाळी हडपसर, महंमदवाडी, कात्रज, धनकवडीतील शंकर महाराज मठ, दत्त मंदिर, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर, पोलीस आयुक्तालय तेथून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व तेथून ठाण्याला ते मध्यरात्री दीड वाजता रवाना झाले.
दाैऱ्याच्या संपूर्ण मार्गावर चौका-चौकात तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यात कात्रज येथे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा होती. सभेची वेळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील निवासस्थानी भेट हा कार्यक्रम एकाचवेळी येत होता. हे लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. त्यात आमदार उदय सामंत यांची गाडी शिवसैनिकांच्या गराड्यात सापडल्याने तिच्यावर दगडफेकीचा प्रकार घडला. या प्रकारानंतर इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी आणखी जादा बंदोबस्त लावण्यात आला होता.
मध्यरात्रीपर्यंत बंदोबस्ताची पहिलीच वेळ
दीनानाथ मंगेशकर येथे प्रकाश आमटे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री रात्री दीड वाजता ठाण्याकडे रवाना झाले. त्यांच्या जाण्याच्या मार्गावर चौका-चौकात वाहतूक व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पोलिसांना रस्त्यावर बंदोबस्त करण्याची ही पहिलीच वेळ होती. याबाबत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपली आठवण सांगितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एकदा त्यांनी पुण्यात असेच खूप कार्यक्रम घेतले होते. तरी त्यांचे कार्यक्रम रात्री ११ वाजता संपल्यानंतर ते परतले होते. या वेळी प्रथमच मध्यरात्र होऊन गेली होती.