...अन् १८ तासांचा क्षीण क्षणात झाला दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:54+5:302021-01-04T04:09:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन येथे रात्री नदीपात्रात एकटा बसलेला मुलगा पाहून पोलिसांना शंका आली. त्यांनी चौकशी केल्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन येथे रात्री नदीपात्रात एकटा बसलेला मुलगा पाहून पोलिसांना शंका आली. त्यांनी चौकशी केल्यावर तो मतिमंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्या पालकांचा शोध सुरू झाला. तब्बल ७ तासांनंतर पहाटे ३ वाजता डेक्कन पोलिसांनी या ८ वर्षांच्या मुलाला त्याच्या आई, मामाच्या स्वाधीन केले.
बीट मार्शल निखिल शेडगे आणि अकिब शेख यांना हा मुलगा १ जानेवारीला रात्री साडेआठ वाजता गस्त घालत असताना नदीपात्रात बसलेला आढळून आला. दोघांनी परिसरात फिरवून चौकशी केली. पण कोणालाही या मुलाची ओळख पटली नाही. शेवटी ते त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात घेऊन आले. तेथे त्याला जेवण दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या सूचनेनुसार या मुलाची माहिती वायरलेसने सर्वत्र पाठविली.
याबाबत निखिल शेडगे यांनी सांगितले की, मुलगा फक्त मम्मीकडे जायचे असे म्हणत होता. आम्ही या मुलाची माहिती व्हॉटसॲप ग्रुपवर टाकली. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देवकुळे यांनी ही माहिती सामाजिक
कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर टाकली. त्यातून मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एका महिलेने या मुलाला ओळखले. तिने या मुलाच्या मामाला कळविले. पहाटे ३ वाजता मामा व त्याची आई डेक्कन पोलीस ठाण्यात आले. मुलाची आई जनता वसाहतीत राहते. तर मामा वाकड येथे राहतो. मुलगा मामाकडे असताना तो १ जानेवारीला सकाळी घरातून निघून गेला होता. त्यांनी वाकडे पोलिसांकडे त्याची तक्रार दिली होती. हे समजल्यावर पोलिसांनी या मुलाला पहाटे आई व मामाच्या स्वाधीन केले.
---
...आणि दिवसभराचा झीण क्षणात दूर झाला
आम्ही सकाळी ९ वाजता ड्यूटीवर आलो होतो. रात्री साडेआठच्या सुमारास हा मुलगा आढळून आला. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पहाटे तीनपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातच होतो. पहाटे त्याचा मामा आला. तेव्हा तो मुलगा झोपला होता. मामाने त्याचे जर्कीन आणले होते. ते देण्यासाठी त्याने या मुलाला उठविले. मामाला पाहाताच त्याने कडकडून मिठी मारुन मम्मीकडे जायचे, असे बोलला. हे दृश्य पाहून आमचा दिवसरात्रभराचा क्षीण क्षर्णाधात दूर झाला.
- निखिल शेडगे
फोटो - १) निखिल शेडगे
२) अकिंचनांना शेख