समिती सदस्यांची १८ला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2016 12:43 AM2016-03-04T00:43:49+5:302016-03-04T00:43:49+5:30
महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला-बालकल्याण , क्रीडा या चार समितींच्या सदस्यांची येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नियुक्ती केली जाणार आहे.
पुणे : महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला-बालकल्याण , क्रीडा या चार समितींच्या सदस्यांची येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नियुक्ती केली जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद कायम राखण्यासाठी उर्वरित समित्यांचे अध्यक्षपद देण्याचे गाजर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दाखविले जात आहे.
महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला-बालकल्याण, क्रीडा समितीच्या सदस्यांची मुदत एक वर्षाची असते. पालिकेतील पक्षीय संख्याबलानुसार या समित्यावर सदस्यांच्या नियुक्तीची संख्या ठरते. या चारही समित्यांमध्ये प्रत्येकी १३ सदस्य आहेत. प्रत्येक समितीत राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचे तीन, भाजप आणि मनसेचे प्रत्येकी दोन आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. या सदस्यांची येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत नियुक्ती होणार आहे. त्यानंतर प्रत्येक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका होतील. मागील वेळेस बदललेल्या समीकरणामुळे मनसेला शहर सुधारणा समिती व महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षदाची लॉटरी लागली होती.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेस, मनसे व भाजपाचे प्रत्येकी ३, तर शिवसेनेचे २ असे बलाबल आहे. राष्ट्रवादीला अध्यक्षपदी उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान एका पक्षाचा पाठिंबा मिळवावाच लागणार आहे. स्थायीचे अध्यक्षपद कायम राखण्यासाठी या समित्यांचे अध्यक्षपद देण्याची तयारी राष्ट्रवादीकडून दाखविली जात आहे.
राष्ट्रवादीने ४ वर्षे स्थायीचे अध्यक्षपद घेतल्यानंतर किमान एका वर्षासाठी तरी अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळावा, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे, तर पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने स्थायीचे अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
स्थायीच्या अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आघाडीमध्ये बिघाडी करण्याची महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची सध्या तरी मानसिकता दिसून येत नाही. मात्र, दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्यास मनसे किंवा शिवसेनेची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)