देशभरातील महानगरांमधल्या सदनिकांच्या विक्रीत १८ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 06:54 PM2019-02-12T18:54:51+5:302019-02-12T19:03:06+5:30
पुण्यासह देशभरातील महानगरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
पुणे : केंद्र सरकारनेघरबांधणीला दिलेले प्रोत्साहन... परवडणाºया घरांसाठी देऊ केलेल्या सवलती यामुळे बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला काहीशी उभारी मिळाल्याचे चित्र आहे. पुण्यासह देशभरातील महानगरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यामध्येच सदनिकांच्या विक्रीत २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे जानेवारी २०१९ अखेरीस २३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षांत २४ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दीष्ट मुद्रांक विभागाला दिले होते. जानेवारीमध्येच उद्दीष्ट टप्प्यात आल्याने, राज्य सरकारने २५ हजार कोटी रुपयांच्या महसुलवाढीचे सुधारीत उद्दीष्ट दिले आहे. बांधकाम व्यवसायात वृद्धी झाल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. नोटबंदी, रेरा कायदा आणि जीएसटी अशा पाठोपाठ आलेल्या बदलांमुळे बांधकाम व्यवसायासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातून बांधकाम क्षेत्र सावरत असल्याचे दिसून येत आहे.
या बाबत माहिती देताना मालमत्ता सल्लागार अनुज पुरी म्हणाले, केंद्रशासीत प्रदेश, मुंबई महानगर, बेंगळुरु, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये २०१८मध्ये १ लाख ९५ हजार ३०० नवीन सदनिका बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्यातील २ लाख ४८ हजार ३०० घरांची विक्री झाली. सदनिकांच्या विक्रीत २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये ३३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
गेल्यावर्षी नव्याने बांधलेल्या सदनिकांपैकी ७७ हजार ५९० सदनिका या चाळीस लाख रुपयांच्या आतील, तर ७० हजार ७० सदनिका या चाळीस ते ८० लाख रुपयांच्या दरम्यानच्या आहेत. सदनिकांची उभारणी आणि विक्रीचा विचार केल्यास सदनिकांच्या संख्येत २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, विक्री १८ टक्क्यांनी वाढली आहे. चेन्नई (१७ टक्के घट) वगळता इतर सहा ठिकाणी घरांच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे. बेंगळुरुत मागणीत सर्वाधिक ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०१८ मधील किंमती निहाय सदनिकांची उपलब्धता
सदनिकांची श्रेणी २०१८
चाळीस लाखांखालील ७७,५९०
४० ते ८० लाख ७०,०७०
८० लाख ते दीड कोटी ३०,३००
दीड ते अडीच कोटी ९,४१०
अडीच कोटी ७,९३०
एकूण १,९५,३००