मेळाव्यात १८१ जणांना ‘आॅन द स्पॉट’ नोकरी
By admin | Published: December 17, 2015 02:08 AM2015-12-17T02:08:33+5:302015-12-17T02:08:33+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा
पुणे : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले असून, गरीब कुटुंबातील आहेत.
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी ‘एक कुटुंब एक नोकरी’ देण्याचे शासनाचे धोरण आहे. यानुसार राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेत हा मेळावा आयोजिला होता. यासाठी ३५१ उमदेवार सहभागी झाले होते. यातील १८१ जणांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपायुक्त आर. पी. झेंडे, प्रकल्प संचालक डी. डी. डोके उपस्थित होते.
मुलाखतीसाठी एमपीटीए एज्युकेशन, टाटा वेस्टसाईड, जीफोर सिक्युरिटी सर्व्हिस या कंपन्या
सहभागी झाल्या होत्या. ग्रामीण भागासह शहर परिसरात त्यांच्या शाखा आहेत. नियुक्तीची पत्रे दिलेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग घेतले जाणार
असून त्यांची कलचाचणीही घेतली जाणार आहे.
८ हजार ९०० पासून १२ हजारापर्यंत वेतन देण्यात येणार आहे. जीफोर सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये ५६ जणांना सुरक्षारक्षकाची नोकरी मिळाली आहे. एमपीटीए एज्युकेशन संस्थेत ‘कमवा व शिका’ हा उपक्रम असून नियुक्त झालेल्या उमेदवारांना पुढील चार वर्षांत तेथे शिक्षणाबरोबर रोजगाराचीही संधी मिळणार आहे.
मेळाव्याचा समारोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी कंद यांनी भविष्यात रोजगार मेळाव्याची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवकांना रोजगाराची सधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यापुढे तालुकानिहाय असे मेळावे जिल्हा परिषदेतच आयोजित करून तालुक्यानुसार बेरोजगारी कमी करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या वेळी दहावी व बारावी पास झालेले उमेदवार सहभागी झाले होते. यापुढे उच्च शिक्षण घेतलेल्यांसाठीही कंपन्यांतील मागणीनुसार हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रकल्प संचालक डोके यांनी सांगितले.
उमेदवारांना या मेळाव्यात घेऊन येण्यासाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी महत्त्वाचे काम केले. (प्रतिनिधी)