बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीतून १९ बांग्लादेशींना पकडले; फरासखाना पोलीस ठाण्याची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 05:04 PM2023-09-01T17:04:36+5:302023-09-01T17:05:45+5:30
भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय बांगलादेशातून दहा महिला आणि नऊ पुरुषांनी भारतात अनधिकृत प्रवेश केला
पुणे: गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शहरात विनापरवाना राहणाऱ्या १९ बांग्लादेशी नागरिकांना शुक्रवारी पकडले. बुधवार पेठेतील वेश्या गल्लीतील कुंटनखान्यात काही महिला व पुरूष बेकायदेशिर पद्धतीने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने छापा मारत १० महिला आणि ९ पुरूष अशा १९ बांग्लादेशींना अटक केली. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा पथकास माहिती मिळाली हाेती की, बांग्लादेश येथून विनापरवाना काेणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय बांग्लादेशातून दहा महिला आणि नऊ पुरुषांनी भारतात अनधिकृत प्रवेश केला आहे. तसेच ते बुधवार पेठेतील वेश्या गल्लीत अनधिकृतपणे वास्तव्य करत असून, ते भारतीय नागरिक असल्याचे कोणतेही दस्ताऐवज त्यांच्याकडे नाहीत. या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला असता १९ जणांना तेथून ताब्यात घेण्यात आले. या १० बांगलादेशी महिला या वेश्याव्यवसाय करत हाेत्या तर ९ बांग्लादेशी पुरुष हे वेगवेगळे व्यवसाय करत हाेते.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पाेेकळे, पोलिस उपायुक्त अमाेल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पाेटे, राजेश माळेगावे, पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबासाे कर्पे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, अमेय रसाळ, सागर केकाण आणि अमित जमदाडे यांनी केली.