आंबळेतील सार्थक आश्रमातील १९ मुले काेरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:01+5:302021-05-09T04:11:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोकमत न्यूज नेटवर्क सासवड: पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील निराधार लहान मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड: पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील निराधार लहान मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या सार्थक अनाथ आश्रमात कोरोनाने शिरकाव केला आहे. आश्रमातील तब्बल १९ मुले कोरोनाबाधित झाली आहेत. ही सर्व मुले ८ ते ९ या वयोगटांतील आहेत. या सर्वांना सासवड-जेजुरी रस्त्यावरील आनंदी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पालक आणि विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरंदरमधील आंबळे येथे सार्थक नावाने आश्रम आहे. यामध्ये सर्व मुले ही निराधार, भीक मागणारी, तर काही मुले रेडलाईट एरियामधील आहेत. आश्रमात एकूण ७९ मुले असून, सर्व मुले ८ ते ९ या वयोगटांतील आहेत. मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिल कुडीया आणि मदतनीस दीपाली पाटील यांच्यासह ९ ते १० जणांचा एकूण स्टाफ आहे. काही दिवसांपूर्वी व्यवस्थापक डॉ. अनिल कुडिया आणि त्यानंतर दीपाली पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर काही दिवसांत आणखी ४ मुलींना कोरोनाची लागण झाली.
त्यामुळे आंबळे येथील ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने आश्रमातील मुलांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये एकाच वेळी तब्बल १९ मुले कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या सर्व मुलांना सासवड-जेजुरी रस्त्यावरील ग्रामीण संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या आनंदी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी तातडीने कोविड सेंटरला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तेथील व्यवस्थापक अनिल उरवणे, मुन्ना शिंदे, डॉ. सुमित काकडे, सागर मोकाशी, विश्वजित आनंदे यांच्याशी चर्चा करून मुलांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
गटविकास अधिकारी अमर माने यांनी वसतिगृहाची माहिती घेतली असून संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आश्रमातील संपूर्ण मुलांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती माळशिरस केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक आबनावे यांनी दिली आहे.
——————————————————————————————
कोट
आश्रमातील सर्व मुलांना आनंदी कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर, आश्रमातील इतर मुलांचे त्याच ठिकाणी विलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दररोज त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत आहे.
- राजश्री थोरात (सरपंच), सचिन दरेकर (उपसरपंच), आंबळे.
---
फोटो
आंबळे येथील सार्थक आश्रमातील कोरोनाबाधित मुलांना खळद येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.