शहरातील पथदिव्यांवर फिटिंग्जसाठी १९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:01 AM2019-02-21T03:01:47+5:302019-02-21T03:02:19+5:30
ईईएसएल कंपनीला काम : पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीही करणार
पुणे : शहरातील पथदिव्यांवर ५२ हजार एलईडी फिटिंग्ज बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने मे. ईईएसएल कंपनीचे नाव सुचविले असून, या कंपनीसोबत करार करण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. यासोबतच अपेक्षित असलेल्या १९ कोटी १६ लाख ६८ हजार रुपये खर्चासही मान्यता मिळावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेने वीज आणि पैशांची बचत तसेच पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पथदिव्यांवर असलेले हायमास्ट दिवे बदलले होते. त्याजागी एलईडी फिटिंग्ज बसविण्यासाठी मान्यता दिली. हे काम टाटा कंपनीला देण्यात आले होते. यामधून होणाऱ्या वीज बचतीचा ९८.५ टक्के हिस्सा संबंधित कंपनीला आणि उर्वरित दीड टक्के हिस्सा पालिकेला मिळेल असा करार करण्यात आला होता.
सद्यस्थितीत शहरात एक लाख ३५ हजार पथदिवे आहेत. पहिल्या टप्प्यात ७५ हजार फिटिंग्ज बदलण्याचे काम टाटा कंपनीला देण्यात आले होते. कंपनीसोबत १२ वर्षांसाठी हा करार करण्यात आलेला असून देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही कंपनीचीच असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र या कामात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याने उर्वरित पथदिव्यांवरील फिटिंग्ज बदलण्याचे काम रखडले. सहा महिन्यांनंतर प्रशासनाने पुन्हा फिटिंग्ज खरेदीचा निर्णय घेतला आहे. शासनाने खरेदीसाठी दिलेल्या निर्णयाच्या आधारे ५२ हजार फिटिंग्ज बदलण्यासंदर्भात निविदा काढण्यात आली.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील मे. ईईएसएल कंपनीची निविदा सर्वांत कमी दराची आली आहे. ही कंपनी आता उर्वरित फिटिंग्ज बसविणार असून, पुढची पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी याच कंपनीची असणार आहे, असे करारासंदर्भात देण्यात आलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
फिलिप्स कंपनीचाच आग्रह का ?
बाजारामध्ये अनेक चांगल्या कंपनीचे एलईडी उपलब्ध असताना फिलीप्स कंपनीचाच आग्रह का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याबाबत पालिकेच्या विद्यूत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की पालिकेने पथदिव्यांसाठी उभारलेल्या फिडर फिलरची स्काडा सिस्टीम तयार केली.
यापुर्वी बसविण्यात आलेल्या दिव्यांच्या अनुषंगानेच ही सिस्टीम तयार करण्यात आली आहे. अन्य कंपनीचे दिवे बसविल्यास पुन्हा नव्याने स्काडा सिस्टीम तयार करुन घ्यावी लागेल. हे काम खर्चिक होईल. त्यामुळे फिलीप्सच्याच फिटींग्ज बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंदुल म्हणाले.