बेदरकार टँकरचे वर्षभरात १९ बळी

By admin | Published: January 21, 2016 01:28 AM2016-01-21T01:28:29+5:302016-01-21T01:28:29+5:30

वाघोलीजवळच्या बकोरी गावच्या हद्दीमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेमुळे जीव गमवावा लागला.

19 victims of unsafe tanker in the year | बेदरकार टँकरचे वर्षभरात १९ बळी

बेदरकार टँकरचे वर्षभरात १९ बळी

Next

पुणे : वाघोलीजवळच्या बकोरी गावच्या हद्दीमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेमुळे जीव गमवावा लागला. चटका लावून जाणाऱ्या अशा एक ना अनेक घटना दररोजपुण्यामध्ये घडत असून, टँकरचालकांच्या बेदरकारपणामुळे गेल्या वर्षभरात तब्बल १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चालकांच्या या बेजबाबदारपणाला आळा घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शहरालगतच्या उपनगरांचा परीघ विस्तारत चालला आहे. तेथील लोकवस्ती वाढत चालल्यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील टँकरचालकांचे चांगलेच फावले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधून अनेकदा पाणी सांडत असते. त्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात घडतात. रस्त्यांवर वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या केलेल्या टँकर्समुळेही अपघाताला निमंत्रण मिळते. गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण अपघातांपैकी टँकरमुळे १८ प्राणांतिक अपघात झाले असून, त्यामध्ये १९ नागरिकांचा जीव गेला आहे.
चालकांचे वाहतुकीविषयीचे अपुरे ज्ञान, वेळेत पोचण्याची झालेली घाई, वेगावर नसलेले नियंत्रण ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. या वाहनांना रिफ्लेक्टर्सही नसतात.
टँकर्समुळे झालेल्या अपघातांचे गांभीर्य ना महापालिकेला आहे; ना ठेकेदारांना. अपघातग्रस्त टँकर्स आणि चालकांवर कडक कारवाईची आवश्यकता आहे. ठेकेदार आणि टँकरचालकांची मुजोरी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठत चालली आहे. (प्रतिनिधी)वाघोली : टँकरची दुचाकीला धडक बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बकोरी गावच्या हद्दीतील वारघडेवस्ती येथे वाघोली-बकोरी रोडवर बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली. अपघातानंतर चालक फरार झाला असून, चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याने तणावपूर्ण वातावरण झाले होते.
अभिषेक राजेंद्र वारघडे (वय १४, रा. बकोरी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा कंपनीमध्ये आईला सोडून दुचाकीवरून पुन्हा घराच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता. मगरवस्ती चौक सोडून पुढे वारघडेवस्ती येथून जात असताना टँकरने दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक फरार झाला़ अपघाताचे वृत्त समजताच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली़ चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइक आणि ग्रामस्थांनी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची खबर समजताच लोणी कंद पोलिसांनी परिस्थिती हाताळत मृतदेह हलविला. अधिक तपास लोणी कंद पोलीस करीत आहेत.

Web Title: 19 victims of unsafe tanker in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.