तिघा भावांची १९ वर्षांनी मुक्तता

By admin | Published: December 13, 2015 02:53 AM2015-12-13T02:53:32+5:302015-12-13T02:53:32+5:30

किरकोळ कारणावरून झालेला वाद... या वादातून एकावर धारदार शस्त्राने झालेले वार... आणि त्यानंतर याप्रकरणी तब्बल १९ वर्षे तीन सख्ख्या भावांवर चाललेला खटला... मात्र, शनिवारी झालेल्या

19 years after the release of brothers | तिघा भावांची १९ वर्षांनी मुक्तता

तिघा भावांची १९ वर्षांनी मुक्तता

Next

पुणे : किरकोळ कारणावरून झालेला वाद... या वादातून एकावर धारदार शस्त्राने झालेले वार... आणि त्यानंतर याप्रकरणी तब्बल १९ वर्षे तीन सख्ख्या भावांवर चाललेला खटला... मात्र, शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये समुपदेशन आणि तडजोडीच्या माध्यमातून हा खटला निकाली काढण्यात आला. त्यामुळे तीनही भावांची खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली.
शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी झालेल्या महा लोकअदालत मध्ये अनेक खटले दोन्ही बाजूंच्या पक्षकारांच्या तडजोडीतून निकाली काढण्यात आले. त्यामध्ये या गंभीर गुन्ह्यातील खटल्याचाही समावेश आहे. ही घटना दि. ८ आॅक्टोबर १९९६ रोजी मांजरी जवळील शेवाळवाडी फाटा येथे घडली होती. या प्रकरणी राजेंद्र रामभाऊ टकले (वय ४६, रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी टकले घटनेच्या दिवशी शेवाळवाडी फाटा येथे आले होते. त्यावेळी राजू हरिभाऊ झेंडे (वय ५०), संजय हरिभाऊ झेंडे (वय ४७) आणि रमेश हरिभाऊ झेंडे (वय ५४, रा. शेवाळवाडी) हे तिघे सख्ख्ये भाऊ तिथे आले. झेंडे बंधू व टकले यांच्यात घटनेच्या दोन दिवस आधी वाद झाला होता.
घटनेच्या दिवशी दोन दिवसांपूर्वी शिवीगाळ का केली, अशी विचारणा टकले यांनी तिघांना केली. यावरून चौघांमध्ये पुन्हा वादावादी झाली. या रागातून तिघांनी टकले यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात टकले जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तिघांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. या प्रकरणात सरकारी वकीलांनी ४ साक्षीदारही तपासले होते. मागील १९ वर्षांपासून हा खटला सुरू होता. शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये हा खटला मांडण्यात आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. बी. म्हालटकर, अ‍ॅड. पूजा ढलपे आणि अ‍ॅड. मेघना कालकर यांनी केलेल्या समुदपदेशामुळे दोन्ही बाजूंमध्ये तडजोड झाली. फिर्यादींनी ही तक्रार मागे घेतल्यानंतर न्यायालयाने तिन्ही भावांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

Web Title: 19 years after the release of brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.